*गारगोटी…..*
*झाली*
*आकाशचांदणी.!*
लहानपणी साऱ्याच गोष्टींचे नवल वाटते. प्रत्येक वस्तू निरखून,पारखून,पाहण्याची सवय असते. असच कौतुक घेवून जन्माला आलेल्या परीची कहाणी.
१७ मार्च १९६२ ला हरियाणातील कर्नल गावात या परीचा जन्म.मध्यमवर्गीय कुटुंब.चार भावंडांमध्ये धाकटी.खूप गोष्टींचं नवल वाटायचं.नेहमी हे असच का? हे तसच का? असे प्रश्न पडायचे,आणि त्याचा ती माग काढायची.अभ्यासात खूप हुशार.दिसामासी परी वाढत होती,पण कुतूहल वाटायचं काही कमी होत नव्हतं..अश्यातच तिला अवकाशातील ग्रहताऱ्यांचे पण नवल वाटू लागलं.ते अवकाश जणू तिला खूणावतच होत.
काय असेल माणसाचं आणि नभांच नात? काय असतील ताऱ्यांची गुपित?कसे असेल अंतराळातील जग? नुसते प्रश्न,प्रश्न,आणि प्रश्न,एक ना अनेक.डोक्यात नुसते पिंगा घालत असत.या प्रश्नांच्या उत्तरांसाठी तिने धरली विज्ञानाची कास. मग काय आत्ताच तिला आकाश ठेंगणं वाटू लागले.आई वडिलांचा विरोध होता,पण मोठ्या भावाच्या पाठिंब्याने तीने धरली अमेरिकेची वाट.
विज्ञानाच्या अभ्यासाच्या ध्यासाने ती अमेरिकेत पोचली. बारा चौदा वर्षे तीने सर्वस्व पणाला लावून अंतराळा चा अभ्यास केला,डॉक्टरेट मिळवली.तिचा हा ध्यास,चाणाक्ष बुध्दी,विलक्षण जिद्द,कष्ट करण्याची तयारी,संघ भावना कामी आली.घेतली दखल अमेरिकन प्रशासनाने.घ्यावीच लागली.मग ती झाली नासा ची खास विद्यार्थिनी.
थोडे जुने तंत्र,भरपूर नवे तंत्र शिकता शिकता शिकली जगण्याचा ही मंत्र.मनी अंतराळाचा ध्यास त्यासाठी साहसी प्रवास.खरोखर किती धाडसी असेल ही कन्या! आणि एक दिवस उजाडला तिच्या आयुष्यात.
कोलंबसाची आठवण म्हणून अमेरिकेत, नासाने तयार केले ” कोलंबिया” यान,ज्याच्या द्वारे अंतराळातील घडामोडींची नोंद घेण्यासाठी जाणाऱ्या इतर वैज्ञानिकांसोबत तिच्या कल्पनेला ही संधी मिळाली.संधीच सोन झाल.मोहीम यशस्वी झाली.कल्पनेच्या नावा बरोबर उंचावली भारताची ही मान.
पहिल्या मोहिमअंतर्गत तिच्यावर काही चुकांचा ठपका ठेवण्यात आला होता,पण शोध घेतल्यावर तिची काही चूक नव्हती हे मान्य केले नासाने.त्यानंतर ती आणखीनच जोमाने कामाला लागली.अभ्यास आणि संशोधन चालूच ठेवले.यावेळीही तिची प्रज्ञा, प्रतिभा आणि प्रयत्न कामी आले.तिची दुसऱ्यांदा शोध मोहिमेवर जाण्यासाठी निघालेल्या सातजणांमध्ये बिनदिक्कत निवड झाली.या शोध यात्रे बद्दल जगभर कुतूहल होत.
१६ जानेवारी २००३ रोजी निघालेल्या कोलंबिया यानातून तन मन झोकून हे एकजान झालेले हे प्रवासी निघाले त्यांच्या पुढच्या प्रवासाला.पण….!पण यातल्या कोणालाच नव्हती कल्पना त्यांच्या पुढच्या परतीच्या प्रवासाची.१ फेब्रुवारी ला योजलेली कामगिरी उत्तमरित्या पार पाडून येताना दिसत होते त्यांना देशबांधव,जे स्वागताला सज्ज होते.
आणि तो क्षण आला,यशाची धुंदी पूर्ण अनुभवता ही आली नाही,तेवढ्यात होत्याचे नव्हते झाले.अगदी पृथ्वीच्या कक्षेत काही अंतरावर असतानाच यानाचा नासाशी असलेला संपर्क तुटला आणि घात झाला.प्रचंड आग उसळली यानाचे तुकडे तुकडे झाले आणि….. आणि त्या सात ही जणांचे प्राण घेतले.यातच आपल्या भारताची गारगोटी ही झाली आकाश चांदणी.जणू तीने तिच्या आवडीच्या स्थानी अढळ पद पटकावले.
सुन्न होत मन तिच्या आठवणींनी.”आय एम फ्रॉम कर्नल इंडिया!”.भारताला अभिमान अशा तिच्या ओळखीचा….
*”होती कल्पना चावला*
*एक शोध यात्री*
*जिने जवळ आणली*
*ते आकाश.. ही धरित्री*
*गेली कल्पना चावला नाही* *होणार विस्मरण*
*जपू तिची आठवण*
*तुम्ही आम्ही मनोमन.*
शब्दांकन: सौ.विनीता दरेकर.