देवाने निर्माण केलेल्या स्त्री आणि पुरुष यापैकी स्त्री ही जरी दिसायला नाजूक कोमल, हळवी दिसत असली तरी तिला देवानेच कणखर बनवले आहे. एखादी जबाबदारी पूर्ण करायची हे जर तिने ठरवले तर कितीही संकटे आली तरी ती जबाबदारी मोठ्या जिद्दीने पार पाडून आपले कर्तृत्व सिद्ध करतेच.
*शिवबाला घडवणारी जिजामाता, स्वतःच्या राज्यासाठी मुलाला पाठीवर बांधून लढणारी राणी लक्ष्मीबाई, स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, अगदी अलीकडे म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, अंतराळवीर कल्पना चावला, इन्फोसिसच्या सुधा मूर्ती, स्वतःच्या जुळ्या मुलांना सांभाळून बॉक्सिंगमध्ये करिअर करणारी मेरी कोम* या आणि अशा अनेक कर्तुत्ववान स्त्रिया आपल्याला माहित आहेत. प्रत्येकीचे त्या त्या काळातले त्या त्या क्षेत्रातले स्वतःचे कर्तृत्व अगदी बावनकशी आहे. त्यामुळे एकीपुढे दुसरीचे कर्तुत्व/महानता अजिबात कमी होत नाही. प्रत्येकीचा गुण घेण्यासारखा आहे आणि प्रत्येकीकडे एक गोष्ट सारखीच आहे ती म्हणजे *जिद्द*.
या सर्व स्त्रियांचे कर्तृत्व आपल्या देशासाठी/समाजासाठी फारच मोलाचे ठरले आहे. मला तर या सर्वच कर्तुत्ववान स्त्रियांबद्दल आदर आहेचआपल्या मंडळातील सर्वांनाच या आणि अशा सर्वच कर्तुत्ववान स्त्रियांबद्दलची माहिती नक्कीच अवगत असणार आहे आणि म्हणूनच मी या अशा महान कर्तृत्ववान स्त्रियांविषयी न लिहिता आपल्या आजूबाजूलाही अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रिया आहेत ज्यांना कधी प्रसिद्धी मिळाली नाही आणि मिळावी अशी त्यांची अपेक्षाही नाही किंबहुना त्यांना आपल्या कर्तुत्वाची जाणीवच नाही, अशा माझ्या पहाण्यात आलेल्या स्त्रीयांविषयी लिहीत आहे.
माझ्या लहानपणी आमच्याकडे एक धुणीभांडी करायला मावशी येत असत. त्यांचा नवरा सरकारी कार्यालयात शिपाई होता. रोज दारू पिऊन बायकामुलांना मारणे हाच त्याचा उद्योग. त्याचा पूर्ण पगार दारुत जाई. पदरी चार मुले. या मावशींनी लोकांची धुणीभांडी करून चार मुलांना शिकविले. बऱ्याच वेळा मावशींचा चेहरा-हात सुजलेला असे अंगावर वळ असत. नवऱ्याचा मार खाऊनही त्या काम करीत. त्यातच त्यांच्या मोठ्या मुलाला चोरीची सवय लागली. आमच्या घरातील पैसे हा मुलगा आला की चोरीस जात. माझ्या आईने प्लॅन करून नोटांवर खुणा करुन त्याला पकडले आणि मावशींना सांगितले. त्यानंतर त्या मावशीने त्याला सुधारण्यासाठी घेतलेले कष्ट मी पाहिले आहेत. आम्हा मुलांना आई नेहमी त्या मावशींचे उदाहरण देई. तिलाही त्यांचा खूप आदर वाटे. सहाजिकच मला भेटलेली पहिली कर्तुत्ववान महिला म्हणजे त्या मावशी.
आज आपण बातम्यांमध्ये पहातो एखाद्या विद्यार्थ्याला उज्वल यश मिळाले की तो घरची परिस्थिती सांगतो. आई-वडिलांचे कष्ट सांगतो. कचरा गोळा करणाऱ्या महिलेचा मुलगाही जेव्हा परीक्षेत घवघवीत यश मिळवतो तेव्हा त्या मुलाबरोबर त्याच्या आईच्याही कर्तुत्वाला दाद दिलीच पाहिजे. आपणही सर्व स्त्रिया अनेक समस्यांना तोंड देत आपल्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडतोच की!
माझ्या मोठ्या जाऊबाईंनी स्वतःच्या हिमतीवर दोन्ही मुलींना उच्चशिक्षित करताना झेललेली आर्थिक संकटे, आरोग्य सेवेतील नोकरीच्या अनुभवाने ७१ वर्षाच्या पतीला अक्षरशः मरणाच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढताना या ६५ वर्षाच्या स्त्रीने घेतलेले कष्ट ही जरी तिची जबाबदारी असली तरी त्यात त्यांचे कर्तुत्व आहेच की! आणि शेजारीपाजारी त्यांच्या या अनुभवातून त्या सर्वांना मदत करतातच. माझी एक मैत्रीण आहे, तीच्या वयाच्या ३२ व्या वर्षी मुलगा १० वर्षांचा आणि मुलगी ७ वर्षांची असताना नवऱ्याचे आकस्मिक निधन झाल्यानंतर सासरच्यांनी जबाबदारी झटकल्यावर अक्षरशः स्वकर्तृत्वावर दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. एवढेच नाहीतर स्वत:च्या आई-वडिलांच्या पडत्या काळात त्यांनाही भक्कम आधार दिला, तेही अतिशय तुटपुंज्या पगारात. अभिमान वाटतो तीचा.
या सर्व स्त्रियांचे कर्तृत्व जरी त्यांच्या घरापुरते मर्यादित असले तरीदेखील एखादी स्त्री जेव्हा स्वतःच्या कर्तुत्वाने आपले घरदार, आपली मुले यांना योग्य मार्गावर आणते तेव्हा पर्यायाने समाजाचेही हितच होते. या मुलांच्या शिक्षणाचा फायदा समाजाला पर्यायाने देशाला होतोच की!
अहो, आपल्या मराठा मंडळाच्या कार्यकर्त्याच पहा ना … आपला घर संसार, आपली जबाबदारी सांभाळून आपल्या मंडळातील सर्व सभासद महिलांची या लाॅकडाऊन मध्ये मानसिक काळजी घेत आहेत. नवनवीन खेळ, स्पर्धा यामध्ये आपल्याला गुंतवून ठेवल्यामुळे इतर टेन्शन मधून आपण आपोआपच बाहेर येतो. नाहीतर या पाच महिन्यांच्या लॉकडाऊन मध्ये कित्येक लोक मानसिक रुग्ण झाले आहेत.
मग आता मला सांगा, या आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्या महिलांचे आताच्या कठीण काळातील योगदान हे त्यांचे कर्तुत्व खूप मोठे आहेच ना! म्हणूनच अशा सर्वच महिलांच्या कर्तुत्वाला माझा सलाम !
सौ. सुषमा मनोहर सावंत