- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments
शब्दांकन: सौ. कल्पना राणे.
आपल्या भारतात कर्तृत्ववान स्त्रिया खूप आहेत. प्रत्येक जणी आपापल्या क्षेत्रामध्ये एवढ्या मात्तब्बर आहेत की त्यांच्या कार्यातून काही ना काही घेण्यासारखे आहे. त्यांचे जीवनच सर्वार्थाने परिपूर्ण आहे. कर्तृत्ववान स्त्रियांचा विचार करायला गेलो तर ठराविक व्यक्तिरेखा, सेलिब्रिटी डोळ्यापुढे येतात. पण काही सर्वसामान्य स्त्रिया त्यांच्या कर्तुत्वाने समाज घडवत असतात. अश्या सामान्यांमधील असामान्य ऊर्जा कळावी, व्यक्त व्हावी म्हणून आज मी जी व्यक्ती निवडली ती कदाचित तुम्हाला माहित नसेल. म्हणून मी मला भावलेल्या कर्तृत्ववान स्त्री ची ओळख करून देते.
नॉर्मल मुलांच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या बऱ्याच स्त्रिया आहेत व त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. पण “मतिमंद मुलं शिकून करणार काय?” असा विचार करणाऱ्या समाजात मतिमंदांच्या शिक्षणाचे बीज रोवणे हे मोठे व खडतर आव्हान होते. ते सहजतेने पेलणाऱ्या प्रा. रेवती हातकणंगलेकर सायकॉलॉजी मध्ये एम. ए. आहेत. सुरवातीला कृपामायी मेंटल हॉस्पिटल मध्ये psychologist म्हणून कामाला सुरुवात केली. काही पालक त्यांच्या मतिमंद मुलांशी फटकून वागत. त्या मुलांच्या शिक्षणाची कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती. तेव्हा प्रा. रेवती यांनी पुढाकार घेऊन पुण्याला “कामायनी प्रशिक्षण संशोधन” सोसायटी मध्ये विशेष मुलांच्या शिक्षणासाठी एक वर्षाचा कोर्स केला. २६ जून १९८३ रोजी नवजीवन मतिमंद मुलांच्या शाळेची स्थापना केली.
त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात मुलांचा आभ्यासक्रम तयार करणे, स्वछतेविषयी माहिती देणे, त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मदत करणे यापासून केली. याच प्रमाणे जयसिंगपूर च्या कल्याण महाविद्यालयात प्राध्यापक म्हणू कामाला सुरुवात केली. त्या सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा पर्यंत कॉलेज मध्ये शिकवून उरलेला संध्याकाळ पर्यंतचा वेळ मतिमंद मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात. शाळेत के.जी. ते अठरा वर्षापर्यंत ची मुलं शिक्षण घेतात. त्या म्हणतात मतिमंद शाळेत येणारे प्रत्येक मुल वेगळं असते, त्यांची बौद्धिक क्षमता वेगळी असते. त्या मुलांमध्ये सगळे गुण असतात.फक्त ते शिक्षकाला शोधता आले पाहिजे. या शाळेत अठरा वर्षे शिकल्या नंतर स्वयं रोजगाराचे व्यावसायीक प्रशिक्षण दिले जाते. ही मुले निसर्गाशी छान जवळीक साधतात. त्यामुळे शेतीचे काम शिकवले जाते. गॅरेजमधील साधी सोपी काम, राख्या बनवणे व विकणे, पणत्या बनवणे,कागदी फुलांचे बुके करणे इत्यादी गोष्टी शिकवतात. नवजीवन शाळा सांगली मध्ये मतिमंद मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी गेली ३० वर्षे कार्य करीत आहेत. “मतिमंद साठी शिक्षण असते” याबाबत समाज अनभिज्ञ होता अश्या काळात संस्थेची स्थापना झाली.
नॉर्मल मुलांना सांभाळणे, वाढवणे हे सुद्धा पालकांना जिकिरीचे वाटते, त्यात मतिमंद मुलांना वाढवणे म्हणजे फारच कठीण असे पालकांना वाटते. अशावेळी त्यांच्यासाठी सकाळी ११ ते ५ शाळा सुरू केली. घरापासून मुलं बाजूला जाते, त्यांच्यामुळे होणारा मानसिक त्रास थोडा कमी होईल म्हणून पालक खुश झाले.
नवजीवन शाळेत शिक्षकांना मतिमंद विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक विकास साधण्यासाठी विशेष शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते. मतीमंद मुलांना प्रत्येक गोष्ट दाखवून अनुभवाद्वारे मनावर ठसवावी लागते. मुलांच्या शाळेच्या शिक्षणाबरोबरच शाळेचा गुणात्मक विकास व्हावा यासाठी नवजीवन शाळेत बरेच उपक्रम राबविले जातात.
प्रा. रेवती यांचे वडील साहित्यिक समीक्षक प्रा. म. द. हातकणंगलेकर. त्यांच्यामुळे लोकांच्या ओळखीचा फायदा शाळेसंबंधित खर्चात झाला. नवजीवन शाळेच्या स्थापनेनंतर चौदा वर्षांनी लोकांच्या मदतीने सांगलीला शाळेसाठी एक एकरची जमीन विकत घेतली. त्यावर पाच वर्ग व ग्रंथालय असलेली इमारत बांधली.
प्रा. रेवती हातकणंगलेकर यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांच्या तीस वर्षांच्या प्रवासात २५ पुरस्कार मिळाले आहेत. रामकमल सिन्हा सुवर्णपदक १९९५, शिवलीला कलामंच पुरस्कार १९९६-९७, समाजसेवा पुरस्कार १९९९-२०००, अपंगमित्र पुरस्कार २००३ इत्यादी.
मग तुम्हाला कश्या वाटल्या मला भावलेल्या कर्तृत्ववान प्रा. रेवतीताई!