- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments
आज अनेक क्षेत्रात महिला उल्लेखनीय कामगिरी करून लखलखत्या तेजस्विनी होत आहेत. अशाच पैकी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या पोलीस दलात आयपीएस अधिकारी बनून आपल्या तेजाने झळकणारी एक हिरकणी म्हणजे आय.पी.एस. डॉ. मीरा चड्डा बोरवणकर. पंजाबची कुडी. डॅशिंग व्यक्तिमत्व. घोडेस्वारी, बॅडमिंटन, स्विमिंग यात तरबेज. महत्त्वाकांक्षी वडील आणि शिस्तशीर आई. शिक्षणावर भर. करिअरसाठी त्याचा फायदा झाला. आयपीएस मध्ये जाण्याची तीव्र इच्छा. कारण युनिफॉर्मचे आकर्षण आणि कॉलेजमधील प्रोफेसर म्हणाल्या तुझी पर्सनॅलिटी पाहून असे वाटते की तू पोलिस दलात जावे. हे मनावर बिंबले. मनाने ठरविले. चॅलेंजिंग काम स्वीकारायचे आणि आयपीएस व्हायचे. १९८१च्या बॅचमध्ये सहभाग. बॅचमध्ये सत्तर मुलगे आणि एकटी मीरा. मुले चिडवित. ‘पद घुंघरू बांध मीरा नाचे रे’ म्हणत. सर्वांचा विरोध. म्हणत परत जा. पण माघार घेतली नाही. हे कोण मला सांगणार? खच्चीकरण होण्याऐवजी मनाने आणखी भरारी घेतली.
पहिल्या महिला आयपीएस अधिकारी झाल्या. महाराष्ट्रात पोस्टिंग. विविध खाती लीलया हाताळली. आपण समाजासाठी आहोत ही भावना. काम करायचे ते कर्तव्य म्हणून. कोणाला बरे वाटावे म्हणून नाही. सातारा येथील पोस्टिंग. दरोडेखोरांची कारवाई मोडून काढली. दरोडे थांबवण्यासाठी आधी अभ्यास केला. दरोडेखोरांची यादी तयार केली. मुळावर घाव घातला की फांद्या आपोआप खाली येतात. मोठ्या गुन्हेगारांना जरब बसवली. साताऱ्यात लग्झरी वर रात्री दरोडे पडत. पोलीस हतबल. मीराताईंनी आजूबाजूच्या तरुणांना संघटित केले. ग्रामसेवकांची टोळी तयार केली. पेट्रोल पंप, धाबे येथे आपले लोक पेरून ठेवले. दरोडेखोरांचा निःपात केला. पुणे येथे असताना कॉलेज तरुण-तरुणींना पोलीस कामात सहभागी करून घेतले. पोलिसांचे काम किती जोखमीचे आहे याची जाणीव तरुणांना करून दिली. सिग्नल मोडून पाडणारे तरुण शहाणे झाले. नाशिक भद्रकाली पोस्टिंग. त्याच वेळी मराठी भाषा शिकण्यास सुरुवात केली. पोलीस शिंदे सर यांची खूप मदत झाली. अभ्यास केला ,डॉक्टरेट मिळवली. कुटुंब आणि जबाबदारीची नोकरी दोन्ही लीलया सांभाळली. कोल्हापूर- चंदगड येथील जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त केला. पोलिसांची धाड पडणार याची गुन्हेगारांना जाण असते. धाडसत्रासाठी सहकाऱ्यांसह सिव्हिल ड्रेस करून गेल्या. जुगा-यांची पळापळ झाली. काचेची बाटली टेबलावर आपटून फोडून ती मीरा ताईंकडे फेकण्यात आली. मोठ्या हुशारीने त्यांनी स्वतःला वाचवले.
दुसऱ्या दिवशी कोल्हापूर वर्तमानपत्रात बातमी. मीरा मॅडमची जुगारी अड्ड्यावर धाड. ७६ हजार रुपये मिळाले. या आधी ७६ रुपये सुद्धा मिळाले नव्हते. मीरा मॅडमची कर्तृत्वं कमान उंचावत होती. “झाशीची राणी” अशी त्यांची इमेज निर्माण झाली. हे करत असतांना अनेक संकटांचा सामना त्यांना करावा लागला. गॅंगस्टर कडून धमक्यांचे फोन येत. नेते मंडळींकडून दबाव येई. पण त्या विचलित झाल्या नाहीत. अजमल कसाब, याकूब मेमन फाशी प्रसंगी त्या स्वतः हजर होत्या. हे स्वतः डोळ्यांनी पाहिले पण आपल्या मनावर आणि कामावर परिणाम होऊ दिला नाही. त्या म्हणतात, every day is new for me. २००९ मध्ये ऑर्गनायजेशनल मॅनेजमेंट मध्ये डॉक्टरेट मिळवली. अनेक शौर्य पुरस्कार मिळाले.
डॉक्टर अब्दुल कलाम अशा थोरामोठ्यांची शाबासकी मिळाली. माजी मुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी त्यांच्या गुणांची पारख केली. “जळगाव सेक्स स्कॅण्डल” भयानक परिस्थिती. तरुणी सुरक्षित नाहीत. त्यांचे शोषण होत आहे. यासाठी पोलिस दलात अधिकाधिक महिलांनी आले पाहिजे. त्यामुळे गुन्हे कमी होतील. “माझ्या आयुष्याची पानं” ह्या पुस्तकाचे लेखन केले. १४ ते २५ वयोगटाच्या मुला-मुलींना प्रेरणा मिळावी हा हेतू. मागून येणाऱ्या तरुणींसाठी वाट निर्माण केली. मिराबाई म्हणजे बेधुंद जीवन. त्या म्हणतात मोठे होण्यासाठी रिस्क घ्या . स्वतःवर शंभर टक्के प्रेम करा. नकारात्मक मानसिकता झुगारून द्या. हार्डवर्क महत्त्वाचे. केवळ पुस्तकी किडा न होता एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये भाग घ्या. करियर ही मॅरेथॉन आहे तपश्चर्या आहे.
डॉ. मीरा चड्डा बोरवणकर यांनी चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे छत्तीस वर्ष सेवा केली. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. निवृत्तीनंतरही त्यांचे समाजकार्य सुरू आहे. खाकी वर्दी बद्दल त्यांना अभिमान आहे. त्या म्हणतात खाकी वर्दी ही शक्ती आहे. अशा या खाकी वर्दी धारण करणाऱ्या कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी आय.पी.एस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांना आमचा मानाचा मुजरा.
जय हिंद!
शब्दांकन : सौ.पुष्पलता संपत मोहिते.