*कर्तुत्ववान स्त्री व्यक्तिरेखा : ‘आमच्या वहिनी’*

दि. २८ ऑगस्ट १९९८, सकाळी सात वाजता फोन खणखणला. “हॅलो…” म्हणताच पलिकडून वहिनांची आवाज आला, “अंजू, आपल्याला ३ सप्टेंबरला दिल्लीला जायचे आहे.” माझ्या होकार-नकाराची वाटही न पाहाता पुढील कार्यक्रम त्यांनी सांगूनही टाकला. हो, ह्या आमच्या वहिनी! माझ्या मोठ्या जाऊबाई! पण बहिणीपेक्षा घट्ट नाते.
२ जुलै १९९८ रोजी अ‍ॅड.श्री. सुधाकर पार्टे (भाई) यांचे निधन झाले. या वज्राघातातून सावरून, आपल्या तीन लेकरांना सांभाळणार्‍या, स्वत:च्या आजारपणाला दूर सारून, कर्तव्यास तत्पर राहणार्‍या आमच्या धीरोदात्त वहिनी – श्रीमती सुहासिनी सुधाकर पार्टे, पूर्वाश्रमीच्या प्रतिभा मारुती शिंदे!
‘सुहासिनी’ नावाप्रमाणे सदा हसतमुख! दोन महिन्यांनंतर वहिनींच्या प्रसन्नतेचा स्वर ऐकून आम्ही सुखावलो. शिवाय बातमीही आमच्यासाठी अत्यानंदाची होती. वहिनींना ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ (१९९७-९८) जाहीर झाला होता (मुंबईतील फक्त २) आणि तो स्वीकारण्यासाठी ५ सप्टेंबरला दिल्लीच्या ‘विज्ञान भवना’त उपस्थित राहायचे होते. आजपर्यंतच्या त्यांच्या कष्टाचे, कर्तव्याचे आणि सेवेचे सार्थक झाले, असे वाटून त्यांचा ‘जीवनपट’ डोळ्यांसमोरून तरळून गेला.
वहिनी, माहेरची ‘प्रतिभा’ नावाप्रमाणे खरंच प्रतिभावान! बुद्धिमान, प्रज्ञावंत, माता-पित्याच्या सुसंस्कारात, एकत्र कुटुंबात वाढलेली. शाळेतच प्रतिभेची ‘प्रतिभा’ दिसून आली. ठाण्याच्या ‘एम.एच. हायस्कूल’मधील कै. परांजपे सरांनी तिला दत्तकच घेतले होते. डॉक्टर होण्याची इच्छा थोपवून शिक्षक-प्रशिक्षण घेऊन शिक्षिका झाली. नोकरी करता करता बी.ए.-बी.एड. केले. लग्नानंतर दोन मुले झाल्यावर एम.ए. केले. योग्य वयात सुविद्य पती मिळाले. पार्टे कुटुंबाची पहिली सुनबाई!
कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळून, आलेल्या शारीरिक, आर्थिक, मानसिक संकटांना तोंड देत, शिक्षण क्षेत्रात सर्वांच्या पुढे राहिली. स्पर्धा, संमेलने, प्रदर्शने, इतर उपक्रम यशस्वीरित्या पार पाडले. शिक्षिका ते मुख्याध्यापिका (१९६९ ते २००४) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत ३४ वर्षे सेवा केली. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानीत केले गेले.
* ‘महापौर पुरस्कार १९८९’ : बृ.मुं.न.पालिका
* ‘आदर्श शिक्षिका १९९०’ : लायन्स कल्ब ऑफ मुंबई (चेंबूर)
* ‘आदर्श शिक्षिका १९९२’ : रोटरी क्लब ऑफ इंडिया (चेंबूर)
* ‘आदर्श मुख्याध्यापिका व आदर्श शाळा १९९४’ : इनरव्हील क्लब ऑफ मुंबई.
* ‘आदर्श शाळा १९९६’ : लायन्स क्लब ऑफ चेंबूर
* ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक १९९८’ : राष्ट्रपती, भारत सरकार
* ‘सामाजिक ऋणानुबंध’ पुरस्कार : खेडेकर ट्रस्ट, मुंबई
* ‘बालकवर्ष’ प्रथम पुरस्कार : आंतरशालेय शिक्षक कविता लेखन स्पर्धा.
त्याचप्रमाणे विविध आंतरशालेय स्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा, वार्षिक महोत्सव, व्याख्यानं, नवीन शैक्षिणक धोरणां अंतर्गत राबवले जाणारे शैक्षणिक उपक्रम, इत्यादींमध्ये हिरिरीने भाग घेऊन वैयक्तिक, तसेच विद्यांर्थ्यांना आणि शाळेला अनेक पारितोषिके जिंकून दिली.  विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी मैत्रीपूर्ण संबंध, अनेक सामाजिक कार्यात सहभाग, गरीब व होतकरू मुलांना दत्तक घेणे, यांसारख्या गोष्टींचा गवगवा न करता त्या साध्य करणे हे त्यांचं आणखी एक कसब.
त्यांच्या सर्व विद्यांर्थ्यांचे यशही वाखाणण्यासारखे आहे. डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, परिचारिका, विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अधिकारी झालेले त्यांचे विद्यार्थी ‘गुरुपौर्णिमे’ला आवर्जून त्यांना भेटायला येतात. या वर्षीच्या ‘कोविड’ परिस्थितीमुळे भेटता न आल्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी ‘व्हर्चुअल’ गुरूपौर्णिमा’ साजरी केली, ऑडिओ-व्हिडिओ पाठवून!
वहिनी संलग्न असलेल्या ‘मैत्री ग्रुप’ने या वर्षी सुवर्णवर्ष साजरे केले. मुलांना शिकवणे या त्यांच्या मनस्वी आवडीबरोबरच त्यांनी टाकाऊतून टिकावू वस्तू बनवणे, कविता करणे हे छंददेखील तितकेच जोपासले आहेत.
वहिनीने मुक्तहस्ताने लिहिलेल्या कवितांचा संग्रह तिच्या मुलांनी ‘स्नेहांजली’ या नावाने छापून, तो त्यांच्या ‘षष्ठीपूर्ती समारंभा’त त्यांनाच भेट देऊन आश्‍चर्याचा एक सुखद धक्का दिला. त्यांच्या कवितेचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या नावाच्या आद्याक्षरांत त्या व्यक्तीचे गुण गुंफून, त्यास शुभेच्छा देतात. 
शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक, मैत्रीची दालने काबीज करणारी, आजही वयाच्या सत्तरीत उत्साहमूर्ती असलेली ही स्त्री माझ्या दृष्टीने ‘एक आदर्श भारतीय कर्तृत्वान महिला’च आहे, असं मला मनापासून वाटतं.
वहिनींचे शिक्षक, जे बालसाहित्याचे एक नावाजलेले कवी आहेत, श्री. एकनाथ आव्हाड यांनी त्यांच्या लेखणीतून वहिनींसाठी काढलेले हे गौरवोद्गार –
­­­­
सुखी व्हावे सर्वांनी, यासाठी धडपड जवळून पाहतो,
हाच आपला गुण, अनेकांना अंतर्मुख करून टाकतो,
सिद्ध नेहमीच देह आपला, बालकल्याणा झिजतो,
नीट जपुनी बालमने, तो अलगद घडवीत जातो,
पारख्या झाल्या जीवासाठी, मदतीचा हात नेहमीच देतो,
रविकिरणांचे लेप लेणं लेवूनी, विद्यार्थ्याचे जीवन उजळवितो,
टेकवूनि नकळत माथ्याला, मी आपली चरणधुलही लावतो.
वाखाणण्यासारख्या वक्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व या गुणांच्या ‘प्रतिभा’वान वहिनींना माझा शतश: प्रणाम !
सौ. अंजली प्रभाकर पार्टे


Leave a Reply