आपली मुंबई

सौ. मनिषा सावंत
.
मुंबई …..मुंबई मध्ये ई हा शब्द आहे आणि आई मध्ये सुद्धा हा शब्द आहे आई जशी आपल्या मुलांना तिच्या पदरात सामावून घेते तसेच काहीसे मुंबई आपल्या सगळ्यांना सामावून घेणारे शहर आहे. नोकरी, शिक्षण अशा विविध कारणास्तव भारताच्या कानाकोपऱ्यातून नाहीतर जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक रोज मुंबईला येतात काही स्वप्नं घेऊन तर काही आकांक्षा उराशी बाळगून.
.
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी मानली जाते तिचा विस्तार खूप मोठा आहे, सात वेगवेगळ्या बेटांनी  आपली ही मुंबई बनलेली आहे. मुंबईचा विकास हा फार वेगाने होतो आहे ,त्यामुळे हे शहर राहण्याच्या आणि वाहतुकीच्या उत्तम सोयींनी परिपूर्ण आहे. असं म्हणतात की मुंबई ही झोपत नाही त्यामुळे रात्री ,अपरात्री सुद्धा अनेक लोक आरामात एकटे प्रवास करतात. देशातील सर्वोत्तम वैद्यकीय आणि शैक्षणिक सुविधा मुंबईमध्ये उपलब्ध आहेत.तसेच अनेकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक संधी इथे उपलब्ध होतात. या सर्व गोष्टींमुळे अनेक वर्षापासून मुंबईचे आकर्षण हे सर्वांनाच होते.
.
मुंबईला निसर्गतः समुद्र किनारा लाभलेला आहे. समुद्र किनारा न आवडणारा मनुष्य विरळाच. त्याचबरोबर इथे अनेक आकर्षणे आहेत. उदाहरणार्थ गेटवे ऑफ इंडिया, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ,जिजामाता उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल , फ्लोरा फाउंटन इत्यादी. यामुळे मुंबईला एक जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे.
.
मुंबईची लोकल म्हणजे या शहराच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. अनेक लोक रोज लोकल प्रवास करतात. या प्रवासात त्यांचे मित्र बनतात तसेच काहींची भजनी मंडळे बनतात ,काहींच्या किटी बनतात. या लोकल ट्रेन मुळे देखील अनेकांना रोजगार मिळाला आहे, छोटे-मोठे फेरीवाले दररोज या लोकलमधून त्या लोकलमध्ये प्रवास करतात आणि अनेक वस्तू विकतात.
मुंबईच्या चित्रपटसृष्टीला कोण ओळखत नाही? बॉलीवूड  म्हणून अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. याला चमचम ताऱ्यांची दुनिया म्हणूनही ओळखलं जातो. अनेकांना या बॉलीवूडने खूप मोठं केलेलं आहे त्यांना आपण सुपरस्टार म्हणतो. त्यांच्या एका दर्शनासाठी त्यांच्या घरासमोर लोक दिवस आणि रात्र ताटकळत उभे राहतात.त्यांची पूजा करतात ,मंदिर बनवतात.
.
अशा या मुंबईमध्ये अनेक जाती-जमातीचे विविध संस्कृती असलेले  लोक आहेत, त्यांनी आपल्या संस्कृतीला मुंबईत राहूनही आणि वेगळ्या प्रकारे जपलेले आहे. असं म्हणतात की मुंबईत अठरा पगड जमातीचे लोक राहतात आणि विविध  भाषा बोलल्या जातात आणि हे दिसून येतं  सणांच्या दिवसांत. मुंबईमध्ये जेवढ्या जल्लोषात गणपती उत्सव साजरा केला जातो तेवढ्याच जल्लोषात नवरात्र, दिवाळी ,ईद ही साजरी केली जाते. मुंबई ही खाण्याची शौकीन मानली जाते, लोक खास खवय्येगिरी करण्यासाठी विविध जागांना भेट देतात. उदाहरणार्थ सीएसटी ची कॅनन पाव भाजी , बडेमिया,  दादरच प्रकाश आणि मामलेदारची मिसळ. हे सगळं माहिती नसलेला माणूसच दुर्मिळ.
.
याच मुंबईचा स्वतःचा असा एक पदार्थ आहे जो आपण वडापाव म्हणून ओळखतो. असं म्हणतात की तो कुठेही खाल्ला तरी तेवढाच मस्त लागतो. अशी आपली मुंबई विविधरंगी आणि विविधढंगी लोकांनी आणि गोष्टींनी नटलेली आहे. सगळ्यांना सामावून घेणारी आहे. अजूनही लोक बरीच स्वप्नं उराशी बाळगून मुंबईला येतात. काही लोक नव्याने मुंबईच्या प्रेमात पडतात. मुंबईवर अनेक लोकांनी कविता केलेल्या आहेत, लेख लिहिलेले आहेत. मुंबई बद्दल काही माहीत नाही असं कोणीच नाही. अशीही सर्वज्ञात मुंबई सगळ्यांची आईच आहे असं म्हणायला हरकत नाही.
.
पण या सगळ्याला एक दुसरी बाजूही आहे, या सगळ्या सोयीसुविधांमुळे इथे दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. कुठेही जायचे असेल तर ट्राफिक आणि तुफान गर्दीला सामोरं जायला लागतं. अनेक लोकांना हे ही समजलं आहे की जर मुंबईमध्ये टिकून राहायचं असेल तर कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणतात ना तुमची कष्ट करायची तयारी असेल तर कोणीही उपाशी राहत नाही. मुंबईसाठी हे रोज दिवसाचं नाही, तर तासाचं समीकरण आहे. तरीही मुंबई कोणाला निराश करत नाही. कधीच थांबत नाही.
.
अशा या मुंबईचा आपण एक भाग आहोत याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे कारण अनेक वर्षांपासून नव्हे शतकांपासून मुंबईने आपल्याला भरभरून दिलेलं आहे. अनेक जखमा सहन केलेल्या आहेत. तरीही जोमाने परत उभी राहिलेली आहे अशा या मुंबईला माझा सलाम!


Leave a Reply