आपलं मुलुंड

सौ. सुषमा मनोहर सावंत
402, उष:काल सोसायटी, मिठागर रोड, 
मंत्रालय सेवा निवृत्त

आपलं मुलुंड 

महानगरी मुंबईचे शेवटचे एक टोक म्हणजे *’मुलुंड’* – मुंबईची हद्द! या मुलुंडशी माझा संबंध 1989 सालापासून आला.  30 एप्रिल 1989 रोजी माझी वरात मुलुंडला आली   
.
माझं माहेर त्यावेळेस बांद्र्याला असल्यामुळे ऑफिसला जायला एकदम जवळ होते आणि बांद्राची त्यावेळेची शान पाहता मला सुरुवातीला तरी मुलुंड आवडले नव्हते.  नावडतीचे मीठ अळणी म्हणतात ना तसेच! किती लांब ते मुलुंड? व्हिटीला जाईपर्यंत थकायला होतं, ट्रेनला किती ती गर्दी बसायला जागाच मिळत नाही, ही आणि अशी असंख्य कारणे होती माझ्या नाराजीची  (अर्थात त्यात छुपी नाराजी ही होती की, आईकडे असताना ऑफिसमधून आल्यावर काहीही काम करायला लागत नसे पण हे सासर होतं ना ) 
.
पण जसजशी वर्षे जाऊ लागली तशी बांद्र्याच्या मातीतून उपटलेल्या या रोपट्याला पालवी आली त्याची मुळे मुलुंडच्या जमिनीत खोलवर रुजू लागली आणि या रोपट्याचा आता सर्वांगाने डेरेदार वृक्ष की हो झाला  आणि इतरांची गप्पा मारताना मुलुंडचा उल्लेख कधी आमच्या मुलुंडला असा होऊ लागला कळलेच नाही. 
.
फार पूर्वी दुर्लक्षित असणारे हे मुलुंड आता एवढे वैभवशाली झाले आहे की आज आमच्या मुलुंड मध्ये फक्त समुद्र चौपाटी नाही बाकी सर्व काही आहे.  वामनराव मुरंजन, किंग जॉर्ज, लक्ष्मीबाई, पुरंदरे हायस्कूल या आणि अशा असंख्य गुणवंत शाळा,  वझे-केळकर आणि मुलुंड कॉमर्स यासारखी नामवंत कॉलेजेस्, फोर्टिस, हिरा मोंघी, अश्विनी यासारखी अत्याधुनिक हॉस्पिटल्स,  चिंतामणी गार्डन, संभाजी पार्क यासारखी सुंदर ठिकाणे लहान-थोर यांच्या फिटनेससाठी आहेत आणि क्रीडापटू तयार करण्यासाठी मुलुंड जिमखाना आहेच, तेथून अजिंक्य रहाणे सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार झाले आहेत. 
.
पश्चिमेला प्रियदर्शनी जलतरण तलाव आहे. मनोरंजनासाठी कालिदास नाट्यगृह आहे. डी मार्ट, बिग बाजार, लाईफस्टाईल यासारखे मॉल आहेत.  पीव्हीआर, आर मॉल सिनेमाची हौस पुरवायला आहेत.  तरुणांचा वीक पॉईंट असलेली खाऊ गल्ली ही आहेच की.  अगदी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भागही मुलुंड मध्ये येतो.  ही भली मोठी लिस्ट पाहता आमच्या मुलुंडला फक्त समुद्र चौपाटी नाही हे खरे आहे की नाही  (तसा तुळशी तलाव आमचाच बरं का) पूर्वी मुलुंड पश्चिमेस अनेक कंपन्याही होत्या पण आता काळाच्या ओघात बंद पडल्या आहेत.
.
आमच्या मुलुंडला खरेदीचीही चंगळ असते   एखादा ड्रेस किंवा साडी मैत्रिणीला आवडली की तिला मजेत सांगून टाकायचे आमच्या मुलुंडच्या मनोरंजन मधली खरेदी कळलं का 
आणखी एक गम्मत म्हणजे 1999 मध्ये आपल्या मुलुंडची *’युक्ता मुखी’ “विश्वसुंदरी”* झाली त्यानंतर जवळपास 5/6 महिने तरी सकाळी ट्रेन मध्ये चढताना आतून एक तरी आवाज यायचा ‘आल्या मुलुंडच्या विश्वसुंदऱ्या’ 
.
आमच्या मुलुंडचा थाट म्हणजे एखाद्याने जर विचारले ‘कुठे राहता?’ आणि तुम्ही जर ‘मुलुंड’ असे उत्तर दिले तर त्या विचारणाऱ्याचे डोळे किंचित विस्फारतात व ती व्यक्ती बोलते ‘मुलुंड का? बर आहे बाबा’.  यामागचे कारण म्हणजे मुलुंड हे विद्यासंपन्न, सुशिक्षित, शांत तसेच उच्च मध्यमवर्गीयांचे स्टेशन समजले जाते (आहेच मुळी) मुलुंडचे एक वैशिष्ट म्हणजे सुशिक्षित आणि सामाजिक भान असलेला समाज. 
.
सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारा समाज. जे सामाजिक व सांस्कृतिक भान पश्चिम उपनगरात पार्ल्याने जपले आहे तेच पूर्व उपनगरात मुलुंडने जपले आहे.  मुंबईत झालेल्या राजकीय, सामाजिक आंदोलनात मुलुंड नेहमीच सहभागी असते. पण कोणताही हिंसाचार मुलुंडकर कधी करत नाहीत. जातीय दंगली मुलुंडमध्ये झाल्याचे मला तरी आठवत नाही. 
.
या मुलुंडची अलिखित विभागणीही करून टाकली आहे.  मुलुंड पश्चिम म्हटले की गुजराती, सिंधी, मद्रासी आणि मुलुंड पूर्व मात्र आमचं मराठमोळं मुलुंड.  पश्चिमेचे पांढरेशुभ्र संगमरवरी शंकराचे मंदिर पाहिले की गुजराती फिल येतोच आणि पूर्वेचे हनुमान मंदिर, संभाजी मैदानातील शंकराचे मंदिर पाहिले की मराठमोळे वाटतेच.
.
 इथे सर्व सणही दणक्यात साजरे केले जातात.  गणेशोत्सव, दिवाळी (आमच्या मुलुंड मराठा मंडळात दिवाळी पहाट असते बरं) गुढीपाडवा अगदी संभाजी पार्कमध्ये 14 ऑगस्टला मध्यरात्री 12 वाजता झेंडावंदन करून 15 ऑगस्ट साजरा केला जातो.  त्याचबरोबर गुजराथींचा नवरात्रातील गरबा, साउथवाल्यांचा पोंगल आणि अय्यप्पा उत्सव हे सगळे गुण्यागोविंदाने चालते.  दसरा-दिवाळी, गुढीपाडव्याला चौकाचौकात घातलेल्या नेत्रदीपक रांगोळ्या डोळ्याचे पारणे फेडतात.
.
मुलुंडचे भौगोलिक स्थानही अत्यंत मोक्याचे आहे.  मुलुंड म्हणजे पूर्वेकडील मुंबईचे प्रवेशद्वार!  त्यामुळे मुंबई बाहेर जाताना मुलुंडकरांना फारसे कष्ट पडत नाहीत. 
.
असे हे *आमचे मुलुंड* आता मात्र मला खूपच भावते.  अभिमान आहे मला *मी मुलुंडकर* असल्याचा! 


Leave a Reply