आपलं मुलुंड

सौं . दीपा सावंत
आशा नगर, मुलुंड पश्चिम

आपलं मुलुंड

‘आपलं मुलुंड’ विषय पुढयात आला, म्हंटल लिहुन तर पाहूया. खर तर शालेय जीवनात ‘निबंध लेखन’ हा प्रश्नच मुळी शेवटच्या क्रमांकावर, तो देखील जरा नावडताच त्यामुळे हे ब्लॉग का काय ते मला कितपत जमेल म्हणता म्हणता, मन अगदी 18 वर्षे चटकन मागे वळलं…. बांद्रा, सांताक्रूझ आणि पार्ले म्हणजे शाळा-घर-कॉलेज ह्या विश्वातून पुढे थेट आयुष्याच्या जोडीदाराबरोबर अगदी शेवटचे टोक मुलुंड गाठलं….. ‘हो शेवटचे टोकच’ तोपर्यंत मुलुंडची माझ्यासाठी व्यावहारीक ओळख हीच होती….तसंही नववधुचे नव्याचे नऊ दिवस संपताच, पुढचा प्रवास हा एडजस्टमेंट करत –अहो जुळवुन घेतच सुरु होतो नाही का? मग माझाही प्रवास काहीसा असाच सुरू झाला….गंमत म्हणजे घरापासून स्टेशन गाठायला रिक्षा ती पण शेयर रिक्षा हा माझ्या साठी एक शोधच होता त्याहूनही पुढे जाऊन सी. स.टी लोकल पकडण्यासाठी ठाणे लोकल पकडायची हा दुसरा शोध. पुढे जाऊन हेच लागलेले शोध चांगलेच अंगवळणी पडले. असेच बरेच प्रासंगिक शोध पुढे लागत राहिले आणि मी देखील त्यात चांगलीच सराईत होत गेले, अहो आता झाले की मी पक्की मुलुंडकर ! 
.
ह्या ऍडजस्टमेंट च्या नादात, प्रवासात मी मात्र मुलुंडकडे माझ्या नजरेतून पाहू लागले…. माझ्यासाठी सुरवातीला मुलुंड म्हणजे दुसरे पार्लेच होते, तोच मराठी बाणा, तशीच कला-संस्कृती जोपासणारे मुलुंड. एक पार्लेश्वर मंदिर, पार्ले G, विमानतळ आणि जुहू बिच वगळले तर अगदी तंतोतंत जुळे, अगदी सारखेच…..असे हे माझे संशोधन,- ‘मुलुंड माझ्या नजरेतून’…… 
.
मुलुंडच्या फलाटांवर दिसणारी ती मराठमोळी गर्दी, चिंतामणी देशमुख गार्डन व तेथील मराठी विश्व, पश्चिमेकडचे जॉन्सन अँड जॉन्सन – देवी दयाळ गार्डन, योगेश्वरी बाहेर जमणारे वरिष्ठांचे घोळके, सणावारांना निघणाऱ्या प्रभात फेऱ्या-रांगोळ्या-प्रात्यक्षिके, संभाजी मैदानात रंगणारे सामने-विविध कार्यक्रम, मुरांनजन-वझे-पुरंदरे-आय. इ. एस – लक्ष्मीबाई शाळा, केळकर-मुलुंड कॉलेजेस, कालिदास नाट्यगृह-क्रीडासंकुल, मुलुंड जिमखाना आणि त्यांच्या तालमीत तयार झालेला क्रिकेटविर अजिंक्य रहाणे, महाराष्ट्र सेवा संघ व त्यांचे अनेक उपक्रम, म.से.सं ची मराठमोळी लायब्ररी, मुलुंड मराठा मंडळ व त्यांचे विविध उपक्रम, जैष्ठ नागरिक संघ, आर.पी.एफ चे गणेश मंदिर व तेथील दर संकष्टीला चालणारी सामुहिक अथर्वशीर्ष उपासना, खंडोबा मंदिर, पश्चिमेचे प्रतीबालाजी मंदिर – अय्यपा मंदिर- अंबाजी धाम- चिन्मय श्रीराम-बालराजेश्वर, केसर बागेतील कडक व्यवस्थापनेतील स्वामी मठ, परमार्थ मार्ग निकेतन, खवय्यांसाठी सुसज्ज अशी योगेश्वरी, हरी-ओम, अन्नपूर्णा, नागरिक, मोनानी, छेडा, मुंबादेवी फेम जिलेबीवाला, मोरब्बी, धनलक्ष्मी-कालिदासचे वडे या सारखी अनेककांची न संपणारी साखळी तसेच दक्षिण्यात्य मेजवान्या घेऊन प्रशांत, विश्वसम्राट, विश्वभारती आहेत च जोडीला उभे. हिरव्यागार भाज्या, फळे, फुलांच्या स्टॉल्स नी गजबजलेले बाजार, मत्स्यप्रेमींसाठी नुसताच मासळी बाजारच नाही तर कोळी मावशीनंची गोड हाक, नवीन पसरत चाललेली जिम संस्कृती.
.
पुढे आता काळा बरोबर मॉल संस्कृतीही इथे जोपासली गेलीच, तसेच काळानुरूप सोसायट्या, कॉलन्या, सदनानच्या, पाड्यांच्या जागा हळूहळू कॉम्प्लेक्स, टॉवर्स घेत आहेत असो तो झाला विकासाचा भाग….. तरिही त्याही अगोदर जे.व्ही.पी.डी – पवई हिरानंदानीशी बरोबरी करणारी इथली स्वप्ननगरी- योगी हिल- मुलुंड कॉलनी, उत्तमोत्तम आधुनिक वैद्यकीय सेवासुविधा, सुव्यवस्थापित शहर रचना, निसर्गाचा कायमस्वरूपी वरदहस्त त्यामुळे सदैव हिरव्यागार डोंगर- झाडाझुडपानी-पशु-पक्ष्यानी बहरलेले, विचारवंत-कलावंतांचा वारसा जपणारे, सामाजिक समता- एकता, कायदा – सुव्यवस्थेचे संरक्षितवलय असलेले, परप्रांतीयांच्या वाढत्या संक्रमणातही आपली मराठी अस्मिता जपणारं असं मुलुंड आणि येथील प्रत्येक मुलुंडकर, गोड-कडू बातम्या-प्रकल्प-जाहिराती यांच्या माध्यमातूनही वृत्तपत्रांमधून आपला कायमस्वरूपी ठसा उमटवत राहणारे मुलुंड…..
.
असं हे माझ्या नजरेच्या टप्प्यातलं त्याबद्दल भरभरून लिहावं, बोलावं असं सर्वार्थाने परिपुर्ण ठरलेले शेवटचे टोक – आपलं मुलुंड.
 
 


Leave a Reply