सौं . प्राची प्रकाश पालव
सुविधा ज्वेल
सेवा निवृत शिक्षिका
आपलं मुलुंड
.
आपलं मुलुंड विषयावर लेख लिहायचा महणजे नेमकं काय लिहू? मी काही मुलुंडची खूप वर्षांपासूनची रहिवासी नाही. त्यामुळे क्षणभर माझ्या मनात हा विचार आला. पण नन्तर खूप विचार केला, म्हटलं आपण प्रयत्न तर करूया! माझे मन मला सांगू लागले, आता तुला १७-१८ वर्षें तर होऊन गेलीत मुलुंड मध्ये येऊन. लिही काही तरी. कारण १९८० साली लग्न झाल्यापासून डोंबिवलीत असताना मुलुंड मध्ये यायचे विचार घोळत होते माझ्या डोक्यात!! तर मंडळी इतके माझे मुलुंडवर तेव्हापासून, मुलुंड न बघताही प्रेम होते.
.
सन २००२ च्या एप्रिल मध्ये शेवटी एकदाची मी मुलुंडमध्ये आले. सुरुवातीला थोडी भीतीच वाटत होती. कसा असेल शेजार? आम्ही सर्व रुळू का तिथे? कारण सगळ्यांकडून ऐकत होते डोंबिवलीतला आपलेपणा मुलुंडमध्ये नाही. पण तुम्हाला काय सांगू? मला आमच्या मजल्यावरचे सर्व शेजारीही अतिशय चांगले, सहकार्य करणारे मिळाले. अडीअडचणीला धावून येणारे,आमच्या सुखदुःखात साथ देणारे. हळूहळू मी रुळायला लागल्यावर मुलुंडचा एक एक परिसर बघण्यास सुरुवात केली. इतके प्रसन्न वाटत होते म्हणून सांगू! गर्दी- गजबजाट नाही. स्वच्छ, प्रशस्त रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी, जणू हिरवा शालू पांघरल्यासारखं आमचं मुलुंड!!प्रवासाची सुसज्ज सोय आहे. मुलुंडहून कुठेही जायचं- यायचं असेल तर, बस- टॅक्सी ची चांगली सुविधा आहे. कधी ट्रेन चा गोंधळ असेल तर मुलुंडमध्ये कोणत्याही वाहनाने पोचता येते.
.
मुलुंड हे सर्वाना आकर्षित करणारे सांस्कृतिक केंद्र आहे. नाट्यप्रेमींसाठी महाकवी कालीदास सारखे नाट्यगृह येथे आहे.महाराष्ट्र सेवा संघ, मराठा मंडळ,विरंगुळा केंद्र अशा नावाजलेल्या संस्था आहेत. इथे छान छान धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने अशा कर्यक्रमांची पर्वणीच असते. महिलांसाठी खास कल्पना विहार,आराधना मंडळ, मराठा महिला मंडळासारखी मंडळे आहेत. महिलांच्या विविध अंगभूत कलागुणांना येथे वाव दिला जातो. मुलुंडमध्ये देशमुख उद्यान,संभाजी उद्यान व अनेक छोटी छोटी उद्याने आहेत. लहान-थोरांचा इथे छान वेळ जातो.हास्य क्लब, गायन क्लास, योग वर्ग, तरण तलाव, कशाकशाची म्हणून मुलुंडध्ये कमतरता नाही. सर्व दृष्टीने सुसज्ज असे हे “आपलं मुलुंड”!! किती वर्णावी तिची महती. म्हणूनच मला मी मुलुंडकर असल्याचा सार्थ अभिमान आहे.