आपलं मुलुंड

सौ. शुभदा परब
लक्ष्मी सदन
निवृत्त शिक्षिका

आपलं मुलुंड

मुंबई मध्ये फ्लॅट घ्यायची आमची शोध मोहीम अखेर मुलुंडला थांबली.   मुलुंडमधील इमारतींची शिस्तबद्ध रचना, स्वच्छ, सुंदर  हिरवागर्द शांत परिसर  यामुळे मी मुलुंडच्या चक्क प्रेमातच पडले.  अशाच निसर्गरम्य पूर्वी ‘वाडी’ असलेल्या केसरबाग, मुलुंड पूर्व परिसरात वन बी.एच.के. घेऊन १९९९ पासून मी मुलुंडवासी झाले. येथील शाळा,कॉलेजे,विद्यालये,ग्रंथालये, चित्र-नाट्यगृहे,हॉटेल्स, मॉल्स अशा उत्तमोत्तम सुखसोयींचा लाभ घेता घेता मुलुंड आपलेआपलेसे झाले.              
.
“विविध कलागुणांचे माहेरघर’ असलेल्या मुलुंडला उत्तम सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. वीसहुन अधिक उत्तम सामाजिक संस्था येथे कार्यरत आहेत. कोणी “हरीयाली” चे धडे देते तर कोणी “प्लास्टिक मुक्त स्वच्छ मुलुंड” चे नारे लावते. उगीच नाही २०१९ ला मध्य रेल्वे प्रशासनाचा “स्वच्छ रेल्वे स्टेशन” प्रथम पुरस्कार आपल्या मुलुंड रेल्वे स्टेशन ला मिळाला! ‘मराठा मंडळ’, ‘महाराष्ट्र सेवा संघ’ अशा नामांकित संस्था बालगोपाळांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम, शिबिरे, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभर राबवित असतात. वैशिष्ट्य म्हणजे सरकारी पक्ष नेतृत्व इतर संस्था एकमेकांच्या समन्वयातून  हिंदू वर्ष शोभायात्रा, महारांगोळी, इतर सण महोत्सव साजरे करताना सर्वांच्या सुप्त कलागुणांना वाव,प्रोत्साहन देत असतात.
.
काळानुरूप अलीकडे ‘चतुर वहिनी’, ‘मुलुंड क्वीन पैठणी खेळ’  अशा स्पर्धांतून स्त्रीशक्तीला विकासात सहभागी करून घेतले जाते. ‘मुलुंड गीत गौरव’, ‘मुलुंड मॅरेथॉन’, निबंध,वक्तृत्व स्पर्धा, यांमुळे संस्कारक्षम पिढी व नेतृत्व घडत जाते. याचाच परिपाक म्हणजे आज अनेक उच्चविद्याविभूषित मुलुंडकरांनी मुंबई,महाराष्ट्र व पर्यायाने भारताच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोचले आहेत. एन. डी. स्टुडिओ मालक नितीन देसाई, प्रसिद्ध चित्रकार चंद्रकला ताई, जगतसुंदरी युक्ता मुखी,  खेळाडू,कवी, लेखक, कलाकार, आणि हो सध्याच्या कोविड 19 मुंबई टीम चे प्रमुख डॉ.संजय ओक.अशी किती नावे घ्यावीत? सध्या कोरोना महामारी मुलुंड मध्ये आटोक्यात ठेवण्यात, गरजूंना मदतकार्य करण्यात आणि दातृत्वातही या संस्था व सहकार्यशील मुलुंडकरांचे योगदानही वाखाणण्याजोगे आहे. म्हणून मुलुंड मुंबईचा मुकुटमणी म्हणून तेजाने झळकत आहे.                     
.
अशा या आपल्या मुलुंड ने ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन २०१८ चे यजमानपद भूषविले होते. कालिदास नाट्य संकुलात अक्षरशः नाट्यज्ञानपंढरीच अवतरली होती. याचे वैशिष्ट्य म्हणजे सलग ६० तास विविध रंगीढंगी कार्यक्रमांची पर्वणीच रसिकांना लाभली. माझी तर ‘ पाहता किती पाहशील दो नयने’ अशी अवस्था झाली. मन तृप्त आणि जीवनाचे सार्थक झाले. त्यावेळी टीव्ही, वर्तमानपत्रे यात मुलुंडच्या कौतुकाचे वर्णन किती भरभरुन झळकत होते हे पाहुन मुलुंडकर म्हणून उर अभिमानाने भरून येत होता.     
  


Leave a Reply