“दो पल के जीवन से, एक उम्र चुरानी है जिंदगी और कुछ भी नही, तेरी मेरी कहानी है”….“““
.
‘शोर’ चित्रपटातल हे गाणं तसं जीवनाबद्दल बरंच काही सांगून जातं पण त्यातील ही ओळ माझ्या मनात मात्र कायम घर करुन आहे……’ _दो पल के जीवन से एक उम्र चुरानी है_ ‘……सध्या ह्या लॉकडाउन ने बरंच काही शिकवलं, आपण सगळ्यांनीच बरंच काही अनुभवलं ही…..पण हे मात्र नक्की की *’जगणं’* हेच सर्वाधिक महत्वाचं आहे…आणि हो हे जगणं खरं तर अगदी सरळ, सुंदर आणि सोपं आहे. आपणच जगणं फार महाग, बरंचसं कॉम्प्लिकेटेड करून ठेवलं आहे.
.
एखाद्या विरघळणाऱ्या आइस्क्रीम सारखे निसटतं आपलं आयुष्य आस्वाद घेण्याअगोदर मिळवण्यातच खर्ची घातलंय….मिळवण्यातदेखील एक आनंद असतो, एक उर्मी असते पण ते मिळवण्यासाठी किती ती घोडदौड… फक्त शर्यत, धावपळ ती पण निरंतर – अंतहीन, आणि हो नुसतं मिळवणच नाही तर ‘अजून’ मिळवणे, थोडं ह्यापेक्षा ही अधिक ++जास्त …थोडक्यात काय सर्वच आपण ‘समाधान’ हा शब्दच जणू पेटाऱ्यात कोंडून शर्यतीत उतरलो आहोत. मागे वळून आयुष्यात डोकवायलादेखील वेळ नाही कुणाकडे….
.
बस एक लॉकडाउन आणि ह्या वेगाला खीळच बसली….बहुदा काळाचीच गरज असावी, महत्वाचा होता हा विराम/Pause. आत्मचिंतनासाठी, पुनःर्भरणासाठी/रिचार्ज होण्यासाठी, नव्याने जगण्यातला तो निखळ आनंद उपभोगण्यासाठी आणि हो _’ *एक उम्र चुराने के लिये* ‘……_ आपल्या मनातल्या कॅमेऱ्यातून क्लिक केलेले आठवणीतले ते क्षण, कधीकाळी आरश्यात स्वतःलाच दिलेली ती एक दिलखुलास स्माईल, घरातला तो तुझा असा विसाव्याचा कोपरा – तुझ्या कॉफी सोबतचा, ती बालपणाची शेवटची पायरी – तारुण्याच्या उंबरठा ओलांडणारी, तो हृदयातला एक छोटासा कप्पा त्याचा / तिचा, नकळत हाती घेतलेला तो हात – हक्काची ती साथ, एखाद्या चित्रपटा सारखे दिसणारे तुझे ते स्वप्न, दिवसभराची शर्यत खेळून थकलेल्या मावळतीचा तू पाहिलेला तो सूर्यास्त, सुख देऊन गेलेली तू कमावलेली तुझी ती माणसं, कुणासाठीतरी हळहळलेलं मन – त्या पाणावलेल्या पापण्या, मिटल्या पापण्या तरी आपसुकच जाणवणारा तुझा तो सहवास…..असेच कित्येक सुक्ष्म ठेवणीतल्या क्षणांचे स्मरण तुमचं माझं आपल्या सर्वांचेच जगणं सुंदर,आंनदी करत असतं.
.
व्यथांची यादी ही केव्हाही न संपणारीच पण ह्या आठवणीतल्या बहुमूल्य क्षणांची, त्या special moments ची सफरच जगण्याला स्पेशल बनवत असते…..स्वतःच्या मालकीचे चोरले न जाणारे असे खूप क्षण असतात, त्या भूतकाळात बुडून जाताना वर्तमानदेखील लहान वाटू लागतो. गरज असते ती फक्त आपण स्वतःहाच स्वतःच्या खुप जवळ जाण्याची आणि आठवणींची डायरी चाळण्याची, त्यात दडलेल्या त्या आनंदी क्षणांच्या सावलीत थोडंस विसावण्याची …….खरंच, आयुष्य खूप सुंदर आहे…..फक्त एक आठवण *_’लाईफ इज ब्युटीफुल’_* पुन्ह्याने पुनर्जीवित करण्यासाठी …. *सिर्फ एक उम्र चुरानी है,* जिंदगी और कुछ भी नही, तेरी मेरी कहानी है”…
.
सौ. दिपा मिलिंद सावंत.