.
‘’ रम्य ते बालपण “असं आपण वार्धक्याकडे झुकलेलो असताना म्हणत असतो.त्या आठवणीत रमताना डोळ्यासमोरून लहाणपणीच्या गमती जमती आठवतात आणि एक सुंदर चित्रपट डोळ्यांसमोरून जातो. तसाच आपल्याला वार्धक्याकडे बघताना दृष्टीकोन ठेवला तर नाही का होणार रम्य ते वार्धक्य !
.
मला वाटतं वार्धक्य म्हणजे तरी काय, म्हातारपण म्हणजेच महातरूणपण असेच म्हणावे लागेल .वयाचे अंक पुढे सरकत जातात पण या वयाचा आणि या अंकांचा काही संबंध नाही आपण जन्माला येतो.जसं आयुष मिळेल तसं जगतो .जे वाट्याला येईल ते आपण भोगत असतो मग सुख असो वा दु:ख एक मात्र नक्की जगण्यात गंमत आहे .मिळालेलं आयुष भरभरून जगायचं . ना कधी भूतकाळाचा विचार करायचा ना भविष्यकाळाचा ……
.
आजकाल जेष्ठनागरीकां कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे .आपण वयाने जेष्ठ असलोतरी मानाने अनुभवाने श्रेष्ठ आहोत .हा विचार फक्त आपल्या साठी असावा.आपण आपल्या व्याधीं,दु:खा मधे न रहाता जगाकडे सुंदर नजरेने पाहिले पाहिजे .जसं बालपणात कशाचं बंधन नसतं तसच वार्धक्यात कशाचं बंधन घालून घवू नये.आपण स्व:तासाठी जगत असताना ..दुसऱ्याच्या आनंदात सहभागी झालं पाहिजे.तेंव्हाच आपण आनंदी होऊ शकतो .
.
आजकाल स्मार्टफोन, टीव्हीवरच्या बातम्या या सारख्या माध्यमातून वृध्दांचा फार कळवळा आलेला दिसतो ,मग काय वृध्दांचे होणारे हाल ,आईवडिलांच्या कथा ,मुलं आईवडिलांना कशी बघत नाही ,अमेरिकेत असलेल्या मुलांच्या कथा वाटस्ॲप गृपवर टाकतात एका कडून दुसऱ्याकडे पाठवतात मग काय चर्चा !पण काय हो सगळा मुलांचाच दोष आहे का !मुलाना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याची स्वप्न आईवडिलांचीच असतात .त्याना त्याचा अभिमान पण वाटतो .अपेक्षा आपणच वाढवतो मग फक्त मुलांनाच दोष का ?कांही वेगळे अपवाद असतात .बी पेरतो तसं उगवतं इतकेच.इतकं प्रेमाने आपल्या पंखा खाली वाढवलेली मुलं अशी का वागतात याचं उत्तर कोणी सांगू शकत नाही.दोष कोणाचा ……
.
आज काल काळ बदलत चालला आहे मानसांचे विचार बदलंत चालले आहेत .आजकाल जेष्ठनागरिक आपले गृप बनवून छान दिवस घालवतात.एकमेकाना मदत करतात ,सहली काढतात,हॅाटेल मधे जातात वाढदिवस साजरे करतात.सध्या बागेत ,मैदानात हास्य क्लब चालतात सकाळी त्यांच हास्य पाहून सगळी बाग हसत असते . किती छान वाटतं ना ! वृध्दानी वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी झालं पाहिजे .त्यात अध्यात्माची जोड असली पाहिजे. मरण तर कुणालाच चुकल नाही त्याची भिती धरून आजचा आनंद घालवता नये .
.
आता सगळीकडे वृध्दाश्रम निघालेत ,अजून त्यात नवीन जसे लहान मुलांचे पाळणाघर असते तसेच आजीआजोंबाचे पाळणाघर आहे . आश्यर्य वाटलं ना ,माझं अगदी तसंच झालं . पण अनुराधाताईंनी “इंद्रधनुष्य “ही संस्था स्थापण केली .त्यांच्या सारख्या अवलियांची त्यांना साथ लाभली .इथे येणाऱ्या आजी आजोंबाचा वेळ मजेत जातो .त्याना गप्पा मारण्या साठी त्यांच्या वयाचे साथीदार त्यांना मिळतात प्रत्येकाला छंद जोपासतां येतो .सर्वांशी एकरूप होवून मित्रमैत्रिणीं बरोबर गप्पा माराव्या ,आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी करता येतात .किती सुंदर कल्पना आहे ना ही !सकाळी यायचं आणि संध्याकाळी गोड आठवणी घेवून घरी जायाचं .त्या मुळे आपली मुलंही निंश्चित असतात . आपल्या मुलांना ,नातवंडाना प्रेम देतां येते ,काय वाईट आहे .आपण आपल्या साठी जगायचं हे वयच असं असतं .
.
आपण आपल्या जबाबदारी मधून मोकळे झालेले असतो .मुलं आपल्या संसारात रमलेलाी असतात त्यांच्या परीने करत असतात त्यांना त्यांची जबाबदारी पार पाडू द्या.आपण त्यांच्यात राहून आपलं वेगळे पण जपू शकतो .सकाळी फिरणं,व्यायाम ,चांगले विचार वाचन ,अगदी डान्स करावा वाटला तरी करावं ,एखाद्या संस्थेत काम करावं म्हणजे आपलं मन आनंदी होईल वय वाढलं तरी मन तरूण राहिलं पाहिजे तर हे वार्धक्य सुसह्य ,सुंदर होईल मग म्हणावं वाटेल
“ रम्य ते वार्धक्य “”आहे की नाही मजा .
.
सौ .प्रमिला सावंत