परमहंस सत्यानंद सरस्वती यांनी म्हटल्यानुसार योग हा कालच्या वारसा आजची गरज आणि उद्याची संस्कृती आहे. योग शब्द युज या संस्कृत पासून आलेला आहे त्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. दहा हजार वर्षापासून योग प्रचलित आहे योग फक्त संन्यासी, योगी, मुनी यांच्यापुरता मर्यादित नाही. तो सामान्य, संसारी, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे करू शकतात. योग म्हणजे फक्त योगासने नाही, शरीर, मन या मार्गातून आत्मज्ञान मिळवणे म्हणजे योग. पण संसारी माणसाला जीवन जगण्याचा संतुलित, संपन्न, सुलभ व योग्य मार्ग योग आहे.
.
योग मध्ये पण अनेक योग आहेत जसे राजयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, हठयोग. हठयोग मध्ये आसने व प्राणायाम यांचा अभ्यास केला जातो. ह म्हणजे सूर्यनाडी ठ म्हणजे चंद्र नाडी यांचा योग तो हठयोग. श्वाशोश्वासाचा शास्त्रोक्त अभ्यास म्हणजेच हठयोग. इडा, पिंगला, सुषुम्ना ही नाड्यांची अध्यात्मिक त्रिपुटी कार्यक्षम होते.
प्राणायाम म्हणजे आपल्या श्वासोश्वास यांचे नियंत्रण आणि विस्तारीकरण.
.
प्राणायाम योग्यरितीने केला तर रक्तातील आणि मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. प्राणायाम आणि योगासने एकमेकांना पूरक आहे. प्राणायाम ज्ञानाच्या अनुभवायची तयारी आहे. योग केल्याने अनेक फायदे होतात, शरीराची कार्यक्षमता आणि लवचिकता वाढते.
.
आसने केल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित होते, पोटांचे विकार होत नाही. कपालभाती केल्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते, त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण राहते. प्राणायाम केल्याने मन शांत होते, एकाग्रता वाढते, फुफ्फुसाचे सामर्थ्य वाढते. सर्व नाड्यामध्ये प्राणशक्ति खेळते स्नायूंना वेदनांपासून आराम मिळतो. प्रतिकार शक्ती वाढीस मदत होते, पचनशक्ती वाढते.
आज आपण कोरोना महामारीच्या संकटात अडकलो आहोत त्यापासून वाचायचे असेल तर योग अंगीकारला पाहिजे. योगाच्या कित्येक क्रिया डॉक्टर आपल्याला करायला सांगतात उदाहरणार्थ जलनेती, प्राणायम, कपालभाती व आसने.
.
योग कोणी सांगून किंवा पुस्तक वाचून करण्याचा प्रयत्न करू नये. योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग करावा. नियमित योग केला तर तुम्ही कोणत्याही आजारापासून दूर राहू शकता, पण त्यासाठी नियमितपणा आवश्यक आहे. आपले आजचे जीवन खूप धकाधकीचे, चिंता, काळजी व समस्या यांनी ग्रासलेले आहे. या सगळ्या समस्या सोडवण्याची योग ही गुरुकिल्ली आहे.
.
सौ अरुणा दळवी
योग शिक्षिका, अंबिका योग कुटीर