मला समजायला लागलं तेव्हापासून मला प्रवास करायला खूप आवडायचे. लहान असताना आईबाबांसोबत, शाळेत असताना मीत्रमैत्रीणीसोबत मी खूप प्रवास केला, खूप मनसोक्त फीरले. कधी कुटुंबासमवेत तर कधी मैत्रीणीं बरोबर.
.
मुलूंडला आल्यावर १९८२ साली तीन दिवसाचा मोठा प्रवास… अष्टविनायक दर्शन केले मिस्टरांच्या मीत्रमंडळी बरोबर. अष्टविनायकाने मला मोठा आशिर्वाद दिला.१९८६ साली आम्ही कुटुंब बँगलोर- उटी- मैसूर -कोईमतूर असा आठ दिवसाचा प्रवास केला. त्या नत्तंर १९९५मध्ये वैष्णोदेवी ,वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग, पंजाबमध्ये सुवर्ण मंदिर पाहिले. हा प्रवास आठदिवस काँलनीतील मीत्रमैत्रीणी बरोबर केला. त्या वेळी प्रमिला सावंत सोबत होती. त्या नंतर २००५ मध्ये बागेतील मैत्रिणी बरोबर हरीद्धारला गेले. तेथे गंगेचे छान दर्शन घेतले. तिथे सायकल रिक्षाने प्रवास केला. पुढे रामझूला, लक्ष्मणझुला पाहून दिल्लीला आलो. सर्व दिल्ली पाहून, इंदीरा गांधी हत्या जागा पाहून, सर्व नेत्यांचे घाटावर दर्शन घेऊन आग्रा येथील ताजमहाल ,पाठीमागे यमुना नदी आणि छोटी छोटी मंदिर पाहून मथूरेलाआलो. मुरलीधर चे प्रचंड भलमोठे मंदिर पाहून डोळ्याचे पारणे फिटले. हा १४ दिवसांचा प्रवास केला. या वेळी सुगंधा परब व प्रमिला सावंत सोबत होत्या. हा झाला गाडी बसचा प्रवास.
.
आता पुढे विमान प्रवास.मला लहानपणापासून विमान या शब्दाची खूप आवड. विमान चित्र काढायचे, कागदाचे विमान बनवून आकाशात उडवायचे. गावी रात्रीच्या वेळी आकाशातुन विमान गेले की त्याचा आवाज यायचा. मग अंगणात धावत येऊन मान ऊंच करून लूक लुकणाऱ्या दिव्याचा आनंद घ्यायचा. पण मला कधी वाटले नव्हते मी विमानाने प्रवास करेन. पण नशिबी असते ते मिळते. मी २००० साली मुबंई ते दुबई प्रवास केला. केवढा आनंद झाला. विमानतळावर पोहचताच भलामोठा परिसर पाहुन आनंद गगनात मावेना!!
.
विमानात बसायचे होतेच, नंतर १ ते २ वर्षानी दुबईला जात होतोच. माझा मोठा मुलगा एमिरेट एअर लाईन्सला इंजिनीयर होता. म्हणून जाणे जमत होते. पुढे २००४ मध्ये मुबंई ते दुबई ते लंडन ते युरोप असा१५ दिवस प्रवास केला. फ्रान्स, बेल्जियम, पॅरिस, हॉलंड असे अनेक देश पाहिले. २००६ साली अंदमान प्रवास केला. २००७ साली मलेशिया सिंगापुर केले. अदंमान आणि मॉरिशस… सावरकरांची कृपा!!! २०१६ आणि २०१८साली ऑस्ट्रेलिया. सिडनी येथे मुलाजवळ तीन तीन महीने राहून आलो. असे लहान मोठे प्रवास केले पण अजून अमेरिका राहीली आहे ना!! असेल नशिबी तर बघायला मिळेलही. आता वयोमानाप्रमाणे शरीराने ही साथ द्यायला हवी. अहो विसरले …मी दरवर्षी मराठा मंडळाच्या पिकनिकला जातेच. अशी मी प्रवासाचा आनंद घेते.
.
घराच्या बाहेर पडले की वेगवेगळी माणसे , त्यांचे छान विचार, निसर्गाचे दर्शन, शुद्ध हवा.. या सर्वानी आपले मन आणि शरीर आनंदी होते. असो लिहिण्या सारखं खूप आहे पण इथेच थांबते. धन्यवाद !
.
सौ विजया शाहू साटम.