१९८६ ची गोष्ट. मी जे.जे इस्पीतळात कक्ष क्रमांक ९ मधे कार्यरत होते. एके दिवशी रात्री २ वा. ३ वर्ष वयाच्या मुलीला घेऊन एक व्यक्ती धावतपळत आली.तिचं नाव कविता. त्यांच्या बरोबर अजून १०-१२ जणं आले होते. खूप सुंदर आणि गोड अशी मुलगी. पाणी मागत होती पण पाणी दिले की अतिशय घाबरत होती. याला हाय ड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे. ती काही दिवसांपासून कुत्र्याच्या लहान पिल्लां बरोबर खेळत होती, त्यांना अंगावर घेऊन फिरव, त्यांच्या तोंडात हात घालून घास भरव असं सगळं करत होती. अजून थोडी माहिती काढली तर कळाले की त्या पिल्लाच्या आईचा काही दिवसां आधी अचानक मृत्यू झाला होता. ते पिल्लू त्या नंतर कविता बरोबरच होतं आणि आता ही मुलगी अचानक आजारी झाली होती. तिचे पालक आधी तिला जवळच्या डॉक्टर कडे घेऊन गेले, पण तिथे गेल्यावर त्यांना मोठ्या इस्पीतळात घेऊन जा असे सांगितले. म्हणून तीचे शेजारी आणि पालक तात्काळ तिला जे.जे. इस्पीतळात घेऊन आले होते. आता डॉक्टरांनी तिची तपासणी करून निदान झाले, कळाले की त्या मुलीला रेबिज नावाचा आजार झाला आहे. हा आजार मुख्यतः भटके कुत्रे, वटवाघळे यां सारख्या प्राण्यामध्ये आढळून येतो आणि प्रादुर्भाव असा आहे की रूग्ण पूर्णतः बरा होत नाही. या सारख्या आजाराचा शेवट म्हणजे एकच…
.
तरीही डॉक्टर, परिचारिका इस्पीतळाचा कर्मचारी वर्ग सगळेच अगदी मनापासून तिच्या साठी प्रयत्न करत होते. तिची अवस्था खूपच दयनीय झाली होती, ते बघून तिची आई सारखी खूप रडत होती, तिच्या वडिलांची स्थिती बघवत नव्हती. त्यांची परिस्थिती गरिबीची होती, परंतु कितीही खर्च झाला तरी चालेल पण माझ्या मुलीला वाचवा, असं ते सारखं सांगत होते.
त्यांचे शेजारीही इस्पीतळात थांबले होते आणि तिची चौकशी करत होते. सगळं तिच्या साठी चालू होते, तिची आवडती खेळणी, चॉकलेट यांचा नुसता खच पडला होता. पण बिचारी कविता काहीच करू शकत नव्हती. तिच्या शरीराचा एक एक अवयव हळूहळू निकामी होत होता. शेवटी पंधरा दिवसांनी बिचारी देवाघरी गेली. त्यानंतरच्या तिच्या आई बाबांचा आक्रोश आम्हाला बघवत नव्हता.
.
आजपर्यंत माझ्या इस्पितळाच्या कारकीर्दीत मी अनेक रुग्ण बघितले पण हिची आठवण मात्र माझ्या मनातून कधीच पुसली गेली नाही. त्या एवढ्या जीवाची जगण्याची धडपड बघून जीवाला खूपच चटका बसला. मरण कुणाला टळले नाही पण असे मरण नको. खरं सांगायचं तर कुत्र्यासारखा प्रामाणिक प्राणी नाही! पण या एका अनुभवानंतर माझ्या मनात मात्र कुत्र्यांची भीती भरून राहिली आहे. आज कुत्र्याकडे एक मिडीयम म्हणून बघितले जाते जे गंभीर आजार ओळखतात आणि आजारी व्यक्तीची निगा राखणारे म्हणून त्यांच्याबरोबर राहतात. आता सर्व घराघरात कुत्र्यांची नीट काळजी आणि निगा घेतली जाते त्यामुळे रेबिज हा आजार जवळजवळ नाहीसा झालेला आहे. पण अजूनही आपण भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा सामना करतच आहोत. म्हणून आपण कायम सतर्क राहिलेलेच चांगले.
.
धन्यवाद!