- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments
मागे वळून पाहताना वाटते ते दिवस चांगले होते, जीवनाच्या प्रत्येक झाडावर आठवणींचे खोपे टांगले होते. मनाचा वेग कोणीच मोजू शकत नाही जसा झोका पुढे जाण्याआधी मागे गेल्यावरच म्हणजे भूतकाळात त्याला गती मिळते व तो भविष्याकडे झेपावतो व नंतर वर्तमानात स्थिर होतं तसेच मनाचे आहे.
.
आमच्या पिढीने समाजात होणारा मोठा बदल पाहिला आहे व त्याबरोबर चालण्याचा प्रयत्नही केला आहे. समाजात होणारा बदल स्वीकारला नाही आणि त्याबरोबर चाललो नाही तर मात्र जीवन दु:खी होऊ शकते. मागे वळून पाहताना मन भूतकाळात रमतं. आमचे रम्य बालपण.मोठी घरे.आजूबाजूला झाडे .घरांचे सतत उघडे दरवाजे. ना चोरीची भीती, घरी येणाऱ्या जाणार्यांचा यथोचित पाहुणचार, शेजार्यांकडे बिनधास्त न विचारता जाणे जिवाभावाच्या मैत्रिणी, उन्हाळ्यामध्ये एकमेकांच्या घरी जाऊन पोळपाट लाटणे घेऊन एकत्रितपणे लाटलेले पापड,केलेल्या कुरवड्या, लोणचे, सांडगे,पाटावरच्या शेवया,वर्षभराची वाळवणे, वर्षभराचा मसाला सर्व काही मोठे डबे आणि बरण्या भरून असायचे.
.
हिवाळ्यामध्ये हिरव्यागार भाज्या.ओला हरभरा,मका, हुरडा यांच्यावर मारलेला ताव. आईने दर रविवारी तेलाने अंगाला, केसाला मसाज करून शिकेकाईने कडकडीत पाण्याने घातलेली अंघोळ. मग रडारड,त्यामुळे दाट लांबसडक काळे कुळकुळीत केश संभार. सणासुदीला लवकर आवरून गणपती, गुढीपाडवा हरतालिका होळी,हादगा नागपंचमीला मेंदीची पाने वाटून ताकात भिजवून तिचे रात्री काढलेले ठीपके, त्याचा आलेला नैसर्गिक लालभडक रंग,झाडांना बांधलेल्या झोक्यावर घेतलेले मोठे झोके, संक्रांतीला सर्व गल्लीमध्ये मोठ्यांना नमस्कार करून वाटलेले तिळगुळ, दसऱ्याला आपट्याची पाने घेऊन सर्वांना वाटून त्यांना “सोने घ्या- सोन्यासारखे राहा” म्हणत वाटलेली पाने, वर्षातून मिळणारे दोन वेळा नवीन कपडे-एकदा दिवाळीला, एकदा वाढदिवसाला. घरातल्या सर्वांचेच कमी कपडे त्यामुळे सर्वच कपडे एका कपाटात विसावलेले. दारात सडा टाकून काढलेली दारातील रांगोळी, त्यात भरलेले रंग गृहिणी चे हस्तकौशल्य दाखवते. दिवाळीला सुरुवात होण्या आधीपासूनच घरोघरी येणारे चकलीच्या भाजणीचे वास,बेसन भाजण्याचे वास,त्याने दिवाळीच्या आगमनाची चाहूल लागायची, थोड्या केपा उडवण्यासाठी बंदूक,भुईचक्र व लक्ष्मी फटाक्याच्या माळांचे बंडल मिळाले की अस्मादिक खूप खुश असायचे.
.
पहाटे लवकर उठून तेल उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान,आईने निरांजनाने ओवाळणे, पहाटेच्या अंधारात प्रकाश देणाऱ्या पणत्या, किल्ल्यावर आसनाधिष्ठ शिवाजी महाराज बाजूला मावळ्यांची फौज व आकाश कंदील अत्तर लावलेल्या नवीन कपड्यांचा सुगंध, फराळाने भरलेले ताट पाहिले की मन तृप्त व्हायचे.
.
पावसाळ्यात फ्रॉकमध्ये गोळा केलेल्या मातीत पडलेल्या गारांचा घेतलेला आस्वाद, पावसाच्या पाण्याच्या ओघाळीत सोडलेल्या कागदी होड्या. त्यांच्या मागे मागे पळणे. ना कधी छत्री ना कधी रेनकोट लागले. एक टॉवेल. पावसाची जोराची सर आली की झाडाखाली थोडा वेळ थांबायचं,असे शाळेत जायचे आणि यायचे. पैशाचा किडा दिसला तर त्याला काठीने टोचायचे. तो लगेच स्वतःभोंवती वेटोळे कसा घालतो ते पाहत बसायचे, पाण्यातले बेडूकराव गळ्यातून वेगवेगळ्या रंगांचे फुगे काढून डराव,-डराव कसे करतात हे पाहत राहायचे. जाता-येता चिंचेची गुलाबी फुले ओरबडून त्याचा कोवळा पाला व फुले खायची.
.
शाळा सुरू झाल्या की कुणाची जुनी पुस्तके अर्ध्या किमतीला विकत घेऊन त्याला पेपर चे कव्हर घालायचे. जुन्या वाहितील पाने गोळा करून त्याचे बाईंडिंग करून त्याच्या वह्या बनवायच्या, गुरुजनांचा आदर करायचा. सुट्ट्या लागल्या की, पोहायला जायचे, सायकलिंग करायचे, भातुकली,विटी-दांडू, लपाछपी,पत्ते, कॅरम खेळायचे. कॉलेजला जाऊन एक-दोन वर्ष झाली की आई वडील लग्नासाठी स्थळे बघायला सुरुवात करायचे आणि लग्न ठरवायचे. सासरी सर्वांचा आदर करायचा, उलटे बोलायचे नाही, घरातील सर्व कामांची जबाबदारी आपलीच आहे असे मनावर ठसलेले असल्याने सर्व कामे करायची.हे जगणे स्वतःसाठी नसून दुसऱ्यांसाठी जगण्यासाठीच आपण आहोत अशी धारणा असायची. त्यामुळे सर्वांचे करून मग वेळ मिळालाच तर तो आपला.
.
पूर्वी स्वयंपाक खोलीचा आकार मोठा असायचा कारण गृहिणी त्यातच जास्त वेळ रमायची. येणाऱ्या अनेक अतिथींच्या जिव्हा तिच्यामुळे तृप्त व्हायच्या. आता स्वयंपाक खोली ही सर्वात लहान झाली आहेत व गृहिणीचा वेळ तिथे कमी जाऊ लागला आहे. नोकरीमुळे तिला तितका वेळच मिळत नाही. त्यामुळे त्यांचा नाईलाज आहे आणि सर्व रेडिमेड मिळते त्यामुळे गरज भागवली जाते.
.
आमची पिढी अगदी पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी, थालीपीठे पासून साउथ इंडियन, पंजाबी, इटालियन,चायनीज फूड,केक्स कुकीज हे सर्व पदार्थ सर्व पदार्थ लीलया बनवायला शिकली.
मागील पिढीच्या सर्व परंपरा व सण सांभाळता सांभाळता पुढील पिढीतील दहा ते पंधरा वर्षात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात झालेले बदल मुलांचे परदेशी राहणे,त्यामुळे कॉम्पुटर शिकणे, मेल करणे सर्व शिकलो. नंतर मोबाईल चे आगमन. मग तर जग खूप जवळ आले परदेशात राहणाऱ्या मुलांच्या वेळांची सांगड घालून केलेली बातचीत व्हिडीओ कॉलिंग, नवीन ॲप बद्दल माहिती असे अपडेट राहावे लागते, त्यांच्याकडे गेल्यानंतर पाहतो की त्यांना सतत ऑफिसची कामे करावी लागतात आपला गैरसमज असतो की परदेशी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच काम केले की संपले. पण घरी आल्यानंतर,वॉशिंग मशीन लावणे,भांड्यांचे मशिन लावणे, जेवण बनवणे,ग्रोसरी आणणे, शनिवारी-रविवारी घराची साफसफाई करणे मुलांना बाहेर फिरायला नेणे यातच त्यांचा इतका वेळ जातो की त्यांना जसे जमेल त्याप्रमाणे ते सण साजरा करतात.
.
आमच्या पिढीने दोन्ही गोष्टी स्वीकारल्या आहेत. मागील पद्धतीच्या परंपरांचा, आजच्या नवीन पद्धतीच्या आधुनिकतेचा मेळ घालून आनंदी राहण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आताच्या स्पर्धात्मक युगात करिअर साठी धडपड करणारी मुले, मुली,असमाधानी वृत्ती, मोठी घरे,त्यांच्या शोभा वाढवणाऱ्या शोभिवंत मूर्ती,पैशाच्या मागे धावणारी पिढी, काही जणांना त्यातून येणारा एकाकीपणा व त्यातून होणारी व्यसनाधीनता व आत्महत्या यांचे प्रमाण फारच वाढले आहे तसेच अहंकारी वृत्तीमुळे घटस्फोटचे प्रमाणही वाढले आहे.
.
मागे वळून पाहताना असे कळते की लहान घरी त्यात राहणारी मनाचा मोठठेपणा असणारी जिवंत माणसे होती, वडीलधाऱ्यांचा धाक होता,त्यांना मान देण्याची वृत्ती सहनशीलता होती व सर्वांशी मिळून मिसळून राहण्याची वृत्ती होती. छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद घेणारी, थोडक्यात समाधानाने जगण्याची वृत्ती त्यामुळे आमची पिढी खूपच खंबीर आणि स्वाभिमान जपणारी आहे याचे मला खूप समाधान वाटते.