- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments
दिपावलीच्या सायंकाळची वेळ !! कानावर भाऊबीजेचं गाणं पडलं “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती,ओवाळीते भाऊराया,वेड्या बहिणी ची वेडी ही माया,” चटकन लहानपणीची आठवण आली. दुपारीच्या जेवणाचा थाट आगळा वेगळा असायचा.तिन्ही भाऊ पाटावर बसायचे, मी पाटाभोवती सुंदर रांगोळी काढत असे. आईची नवीन साडी नेसता येत नसली तरी गुंडाळायचे व आईचे दागिने घालायचे. साडी सावरत हातात आरतीचे ताट घेऊन भावांना आरती करायचे. माझा मोठा भाऊ मला हेच गाणे म्हणायला सांगायचा कारण त्याच दिवशी त्याचा वाढदिवस असायचा.त्यामुळे त्याला दोनदा आरती. आज आरती माझा हातात आहे.पण पाटावर एकच भाऊ बसलेला हे चित्र कधी बदललं हे कळलंच नाही.
.
कॉलेज जिवन संपवून मी वेंगुर्लयाहून मुंबईत आले. बँकेत नोकरी मिळाली. म्हणता म्हणता माझे लग्न झाले. मोठा परिवार लाभला दीर,नणंद ,मोठीजाऊ, सासू- सासरे.दिवस कधी सुरू व्हायचा कधी मावळायचा हे कळत नव्हत. दोन वर्षानी माझ्या मोठ्या मुलाचा जन्म झाला. सगळे कौतुक करण्यात मग्न व उगाचच धावपळ सुरू असायची कारण अतुल सगळ्यांचा लाडका..!
.
आम्ही नंतर मुलुंड मध्ये राहायला आलो.अतुल च्या पाठून दुसरी मुलगी श्रद्धा . दोघांचा सांभाळ करून नोकरी करणं कठीण झालं. शारीरिक व्याधीनी डोकं वर काढलं होतं. त्यामुळे नोकरी करणं कठीण झालं. मुलांकडे लक्ष देण्यासाठी कोणी नसल्याने गरज असतानाही मला नोकरी सोडावी लागली.पण नंतर मुलुंड मध्ये शाळेत शिक्षिकेची नोकरी व शिकवण्या केल्या. मनाशी एकच धेय होतं मुलांना उच्च शिक्षण द्यायचे. मुलाने स्वताःच्या हिमतीने अमेरीकेत जावे.स्वत:चा अभ्यास स्वत: करून अतुल ने संगणकातील अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले व मुलीने उच्च शिक्षण घेतले. शिक्षण झाल्यावर अतुलला टाटा कंसल्टन्सी कंपनीत नोकरी मिळाली व कंपनीतून अमेरीकेत ( टेक्सासला) जायची संधी मिळाली. तेव्हा वय अवघे २२वर्ष व कधी ही घर सोडून राहीलेला नव्हता.त्याला एवढ्या दूर कसं पाठवायचं हा प्रश्न.जायच्या दिवशी रात्री अतुलला सोडायला आम्ही विमानतळावर गेलो. अतुल एकटाच आत गेला.काचेच्या दरवाजा बाहेर मी उभी होते. डोळे आसवांनी भरून वाहत होते.धेयपूर्तीसाठी आपलं लेकरू एवढं दूर पाठवावे योग्य आहे का देवा .फक्त देवाचा धावा करत होते.आल्यावर संध्याकाळ फोनची वाट पाहण्यात गेली. दुस-या दीवशी दुपारी फोन खणाणला . अस्पष्ट आवाज. समोरच्या बाजूला अतूल होता ,”आई मी सुखरूप पोहचलो”. त्याची खुशाली मिळाली व माझा जिव भांड्यात पडला.
.
मधेच एकदा वाटेत माझी बाल मैत्रिण चित्रा धुरी (खामकर) भेटली व मला मुलुंड मराठा मंडळाचे सभासद होशील का असे विचारले. क्षणाचाही विलंब न करता मी होकार दिला . मराठा मंडळात मला खुप चांगली माणसे भेटली व मी शनिवारी वधूवर सुचक मंडळात जाऊ लागले. त्यामुळे मला प्रज्ञा, सुहासिनी, शिल्पा,माधुरी,सुषमा ताई, महेश, कडू काका भेटले. आजही मला पत्र्याचं छोटसं कार्यालय ते भव्य इमारत हा प्रवास आठवतो.
.
पण मुलगा पुण्याला नोकरी निमित्त आल्याने मलाही पुण्याला यावे लागले.पण दूर गेल्याने नाती तूटत नाही व जवळ रहिल्याने जोडत नाही ह्याचा अनुभव आला. मी मराठा मंडळाच्या परिवाराला whatsapp द्वारे परत जोडले ह्यात आनंद आहे. शेवटी काय उत्तरायणात जीवनरूपी प्रवासाच्या आठवणीच्या हिंदोळयावर फक्त झुलायचं असतं.