*मागे वळून पाहतांना…*
*जाग मनाला आली.*
*राहून गेले जे,ते करण्या…*
*जगण्याची मध्यान्ह झाली!*
.
*आपला भूतकाळ ही आपल्या वर्तमानाची सावली असते असे म्हणतात! त्या सावलीला सोबत घेऊनच आपल्याला भविष्याकडे वाटचाल करायची असते. आयुष्याची बरीच वर्षे निघून गेल्यानंतर मागे वळून पाहतांना बऱ्याच गोष्टी डोळ्यांसमोर तरळून जातात. इतकी वर्षे आपण कधी गेलेल्या काळाचा विचारच केलेला नसतो. रोजच्या रहाटगाड्यात तेवढी उसंतच मिळालेली नसते म्हणा! येणारा दिवस ढकलायचा एवढेच रुटीन झालेले असते. पण कधीतरी थोडं थांबून मागे वळून पाहणं ही खूप गरजेचं असतं. यामुळे जुनी माणसं, जुन्या मैत्रिणी, जुने शेजारी, जुन्या आठवणी यात रमता येतं. काही वेळा मागे वळून पाहतांना वेगळंच जाणवतं.*
.
*असंच झालं माझं काहीसं. आज सकाळपासून माझ्या मनात एक रुखरुख लागून राहिली होती. मन थोडं मागे जाऊन सर्वत्र फिरून आलं. जर असं केलं असतं तर…तसं झालं असतं. आणि जर तसं मिळालं असतं… तर आता असं झालं असतं वगैरे वगैरे. अशा जर-तर चा आता खरंतर काहीच उपयोग नाही कळतंय. मग या गोष्टी का बरं आज मनात येत होत्या? असो! जे झाले ते झाले. आता नव्याने सुरुवात होतेय हेही नसे थोडके!*
*चालतांना जीवन-वाट,*
*सहज मागे वळून पाहिले,*
*खूप काही करायचे राहून गेले,*
*मजला जाणवले!*
*नाही विषाद वाटला मला,*
*ना मी मुळीच निराश झाले,*
*स्वप्नांच्या माझ्या पूर्तीस्तव,*
*उत्साहाने आता तयारीस लागले!*
.
*त्याचं झालं असं की , काही दिवसांपूर्वी माझी एक ओळखीची (मैत्रीण(?)) बऱ्याच वर्षांनंतर म्हणजे साधारण माझ्या लग्नानंतर पहिल्यांदाच भेटली. तिला कुठूनतरी कळलेले की मी रांगोळ्या, गाणं, चित्रं, नृत्य, वादन इ.काय काय करते. म्हणते कशी ,”अगं आहे तशीच आहेस अजूनही. पण पूर्वीसारखी लाजरी बुजरी नाही वाटत. तीच का तू? किती बुजरी होतीस!, खाली मान घालून चालयचीस, तोंडातून शब्दही फुटायचा नाही. कोणासोबत बोलायची नाहीस. आता किती भडाभडा बोलतेयस. आणि काय काय करतेस! माझा विश्वासच बसत नव्हता जेव्हा तुझ्याबद्दल ऐकले तेव्हा! रांगोळ्या,चित्रं शिकलीस का? आणि डान्स,गाणं कसं काय सगळं जमवतेस? वाटलं नव्हतं तू एवढी उत्साही वगैरे असशील! आणि तेही आता या वयात! नोकरी करत असशील नं?” मी म्हटलं,”बाई गं मी घरीच असते. म्हणूनच हे सर्व छंद, आवडी जोपासू शकतेय आज. नोकरी नाही करत मी”. म्हणते “काय गं अशी तू, कलेचे शिक्षण का नाही घेतलंस तेव्हा? नोकरी का नाही केलीस. रिकामटेकडं का रहायचं? पैसे कमवायचे. शिक्षणाचा काय उपयोग मग तुझ्या?” तेव्हापासून मनात सतत विचारांनी काहूर माजवलंय. तिचा ‘रिकामटेकडं’ हा शब्द मला खटकला. खरंच का बसले मी घरी? पैसे कमवू शकलेच असते की! नाही नाही… पैसे कमावणे हे ध्येय कधीच नव्हतं, आजही नाहीय. नोकरी केली नाही म्हणून पश्चात्ताप मुळीच नाहीय. कारण पैशाची गणितं कधीच केली नाहीत.
.
कुठलीही स्त्री नोकरी न करता इतर खूप विधायक,समाजउपयोगी काम करूच शकते की! आपली आवड जपू शकते. मीही आता माझे छंद, आवड जपतेय. पण रुखरुख एवढीच आहे की यात योग्य शिक्षण घेतले असते तर कदाचीत आज या कला क्षेत्रात कुठच्या कुठे असते हे मात्र नक्की! मागे वळून पाहतांना आठवतंय… इ.सहावीत असतांना माझी चित्रकलेतील आवड पाहून चित्रकलेच्या सरांनी एलमेंटरी परीक्षेला बसवले. दर रविवारी दुपारी मुलुंड(प) शाळेत क्लास साठी जावे लागायचे.भर दुपारी उन्हातून एकटीने जायचे या काळजीपोटी पप्पांनी क्लास सोडायला सांगितले. आणि चित्रकला शाळेपुरतीच मर्यादित राहिली. घरी पप्पा तबला वाजवायचे, गाणी गायचे. मला फार आवडायचं गायला. पण गाणं शिकावं असं काही तेव्हा वाटलं नाही. चांगल्या ठिकाणी लग्न जमण्यासाठी नोकरी पाहिजे. त्यासाठी चांगला अभ्यास करून, भरपूर शिकून,चांगली नोकरी मिळवावी लागेल, असे सतत घरी कानावर पडायचे. त्यामुळे फक्त अभ्यास करायचा. अर्थात अभ्यासात काही एवढी हुश्शार वगैरे नव्हते. पदवीनंतर पुढील शिक्षण तसंच वेगळं काही केलं नाही. लगेच नोकरी पत्करली. बँक,रेल्वे च्या परीक्षा दिल्या पण तिथे काही झाले नाही. प्रयत्न कमी पडले किंवा केलेच नाहीत म्हणा ना! प्रायव्हेट क्षेत्रात थोडी वर्षे अकाउंट्स मध्ये नोकरी केली. लग्न झाले. मुलगी झाल्यावर मुलीला सांभाळण्याचा प्रश्न आला म्हणून नोकरी सोडली. मुलीला वाढवणे,तिचा अभ्यास, सणासुदीला गावी जाणे-येणे यातच दिवस पुढे सरकत होते. स्वतःचे घर घेतले. त्यामुळे काटकसरीचा संसार सुरू झाला.
.
आर्थिक बाजू सांभाळताना माझ्या सर्व आवडी निवडी, हौस-मौज यांना बाजूला सारावे लागले. बाहेरच्या जगापासून थोडे लांब झाल्यामुळे आत्मविश्वास कमी होत होता. स्वभाव शांत, बुजरा होताच त्यामुळे तशा कोणी जवळच्या मैत्रिणीही नव्हत्या. कुठेच मन रमत नव्हते. मग कॉम्प्युटर अकाउंट्स ची छोटीमोठी कामे घरीच करायला घेतली. मुलीच्या शाळेत पालक प्रतिनिधी म्हणून काम करत होते. तसेच कधी कधी शिक्षकांच्या गैरहजेरीत वर्ग सांभाळण्याची जबाबदारी-संधी मिळायची. यातूनच शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन मध्ये विद्यार्थ्यांचे कार्यक्रम बसविण्याची संधी मिळाली. संधीचे सोने केले आणि पुढे प्रत्येक स्नेहसंमेलनमध्ये माझा सहभाग अटळ झाला. यातून नृत्याची असलेली आवड थोडक्यात का असेना पूर्ण होत होती. पेंटिंग क्लास साठी घरातून पाठींबा होता. परंतु या सगळ्या गदारोळात ते राहूनच गेलं. रांगोळीची आवड दरवाज्यात छोटी रांगोळी घालण्यापूरतीच सीमित होती. मुलीच्या अभ्यासाची माझी जबाबदारी संपली होती. त्यातच लहान वयातील माझ्या एका मोठ्या मेडिकल इशू चे निमित्त झाले आणि मग मन गुंतवण्यासाठी, वेळ सत्कारणी लावण्यासाठी बाहेर पडायचे ठरवले. गेली कितीतरी वर्षे मराठा मंडळ मुलुंड,मुंबई ची सभासद होण्याचा राहून जात असलेला योग यानिमित्ताने आला. आणि माझ्या पुढील आयुष्याला कलाटणी मिळाली. हा योग माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंटच ठरलाय!!*
.
*या वळणावर मात्र मला, माझ्या मागील वळणावर जे राहून गेलं होतं ते गवसतंय. आत कुठेतरी सुप्त अवस्थेत पडून राहिलेलं आता उसळी मारून बाहेर उडी मारू पाहतंय. इथे मला वेगवेगळ्या संधी मिळतायत. मी त्यांचं सोनं करण्याचा प्रयत्न करतेय. रांगोळ्या, गाणं, नृत्य, वादन, पेंटिंग्स , पाककला, थोडंफार लिखाण करतेय. आपण सारे गाऊया मधून गाण्याची संधी मिळतेय. कौतुक करून घेण्यात मज्जा येतेय. सिनिअर महिलांना सोबत घेऊन कार्यक्रम बसवतांना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद शोधता येतोय. त्यांचा मिळणारा आशीर्वाद मोलाचा वाटतोय! खरंच खूप भारी वाटतंय आता! इथे वेगवेगळ्या प्रकारची कामे करतांना मिळणारा आनंद अवर्णनीय आहे! समाधान मिळतंय. हे सर्व करतांना घरच्यांचा पाठींबा आणि सहकार्य आहेच. लहान-मोठ्या अनेक मैत्रिणी मिळाल्या आहेत आणि आता त्या जिवाभावाच्या झाल्या आहेत. रक्ताचे नाते नसूनही आपलं मानणारी,माझे कौतुक करणारी मला उत्तेजन देणारी ज्येष्ठ मित्रमंडळी लाभली आहेत. या सर्वांचा मला पाठींबा व मार्गदर्शन वेळोवेळी मिळत आहे. आज मी माझं स्वतःचं कलाविषयक you tube चॅनेल सुरू केलंय. राहून गेलेलं सर्व आणि अजून खूप काही आता करता येतंय. मागे वळून पाहतांना आता लक्षात येतंय की आताचा हा पुढील रस्ता खूपच छान आहे.
.
आनंद मिळतोय. उत्साह तर ओसंडून वाहतोय नुसता!🏻 अजून खूप काही करायचंय, मिळवायचंय , खूप काम करायचंय. प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधायचाय. खूप आनंदी, उत्साही, मनाने तरुण रहायचंय. मागे वळून पाहून आठवणींचे क्षण वेचायचेत आणि पुढील वळणावर त्या आठवणींची आताच्या क्षणांसोबत बेरीज करायचीय. लवकरच या दुष्ट कोरोनावर मात करून, सर्व जिवलगांसोबत पुन्हा एकदा उसळी मारायचीय. आनंदाचे बी पेरायचेय…. आनंदाचे झाड वाढवायचेय… आणि सर्वांसोबत या आनंदाची फळे चाखायची आहेत!!*
.
*चढत आहे मी ध्येय पर्वत शिखर*
*अजून ते खूप दूर, दूर उंच आहे!*
*परि थकवा नसे येत मज कधी*
*नवी नवी ऊर्जा रोज मिळत आहे!*
*थांबते मी वळणावर,*
*हळूच मागे वळून बघत आहे!*
*दूर खाली राहिला माझा पहिला टप्पा,* *अंधुकसाच आता दिसत आहे!*
*’थांबला तो संपला!’,*
*या उक्तीवर माझा दृढ विश्वास आहे!*
*फक्त मज आशीर्वाद द्यावा आपण,*
*हीच माझी नम्र विनंती आहे!*
.
*सौ.ऐश्वर्या(संगीता) ब्रीद*