सौ.अंजली प्रभाकर पार्टे
मार्च महिन्याचे दिवस. आम्ही सगळे काही कामासाठी वेंगुर्ले मुक्कामी गेलो होतो.
सकाळपासून आकाश निरभ्र होते. हळूहळू सूर्यकिरणांचा दाह वाढू लागला. रोजच्यापेक्षा जास्त तीव्र वाटू लागला. दुपारपर्यंत कडक ऊन होते, पण भर दुपारी काही क्षणात ऊन्ह नाहीशी होऊन पावसाळी ढग जमू लागले. बघता बघता विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि क्षणात भर पावसाळ्यात पाऊस पडतो तसा जोराचा पाऊस सुरू झाला.
.
पावसाच्या जोरदार धारा बघताबघता मनाच्या अंतरंगातून आठवणींच्या धारा वेगाने बाहेर आल्या आणि अशा माणसांच्या आठवणी दाटून आल्या की कित्येक वर्षात त्यांना पाहिलेलं देखील नाही. पण मनात खोलवर कुठेतरी दडून होत्या. आपलं नातंगोतं असेल असं नाही पण सख्यांपेक्षाही त्यांच्याशी नातं असावं.
.
सकाळी सात वाजले की आमच्या दारात आवाज येई , “माई भांडा आणा” हेच आमचे दूध घेऊन येणारे कुडपकर काका! दोन मैलावरून चालत यायचे. आल्यावर शांत बसायचे. कधीकधी माझी आई ( माई) त्यांना चहा द्यायची. एखादी विडी ओढली की झाकणासहीत ठेवलेल्या दुधाच्या भांड्यात दूध ओतले की काकांचा परतीचा प्रवास सुरु व्हायचा. आम्ही लहानाचे मोठे होत होतो पण काकांचा नित्यनेम चालूच होता.
.
काही वर्षानी त्यांना बोलण्याचा त्रास सुरू झाला. जेवण कमी झाले. थकवा वाढला.डॉक्टरानी म्हणजेच माझ्या वडिलानी निदान केले, श्वसनलीकेचा कॅन्सर झालाय.
गोवा मुंबई सगळीकडे त्यांची तपासणी झाली पण निदान तेच. माझा वडीलानी उपचार करावेत ही त्यांची ईच्छा. सगळ्याना खूप वाईट वाटले . काका आता दूध द्यायला येणार नाहीत ही कल्पना सहन होईना. सगळ्या आठवणी मनात तशाच साठून राहिल्या.
.
आठवणींच्या प्रवाहातून दुसरी लाट आली. आमच्याकडची कामाला असलेली मुलगी “एकादशी” खूप प्रेमळ, अशिक्षीत आणि विसरभोळी. ती तशी लहान होती. तिची आई तिला आमच्याकडे घेऊन आली. अगदी निरागसपणे तिने माझ्या आईला सांगितले, “माई, मी सगळं करेन, पण मला पोटभर जेवायला वाढ.” दुसर्या दिवशी सात वाजता एकादशी आमच्याकडे आली. एकदम गलिच्छ. आईने आमचे जुने कपडे तिला घालायला दिले. हळूहळू ती आमच्या घरात एवढी रुळली की आमच्या घरीच झाली. आम्हा सर्व भावंडांचा ती निरोप्या. काही खायला पाहीजे का मधून मधून विचारायची. कारण ती भूकाळ होती. आम्ही काहीही मागितले की वाक्य पूर्ण व्हायच्या आत वस्तू हजर. गावात कुठे काहीही पाहिले की ते आम्हाला सांगितल्या शिवाय तिला चैन पडत नसे.
.
एकादशीला काही विचारलं की सांगायची “ते का पाय धुऊक पाणी देवक नको.”
काही वर्षानी तिच्या आईने तिचं लग्न केल. पण काही महिन्यातच एका रात्री ती पळून आली आणि आमच्या मागच्या पडवीत येऊन झोपली. सकाळी उठल्यावर आई सवयीनुसार मागच्या बाजूला गेली. एकादशीला पाहताच आई घाबरली. तिच्या आईला बोलावून घेतले. आईने तिला विचारले एकादशी तू इथे कशी ? तिने रडायला सुरुवात केली. थोड्या वेळाने तिची आई आली. दारुड्या नवरा आणि त्याच्या घरातल्यंची कथा सांगून रडू लागली. एक वेगळं आयुष्य जगत होती. अजूनही आमच्यापैकी कुणीही गावी गेले की तिला लगेच कसं कळतं माहीत नाही. काठी टेकत टेकत येऊन आमच्या समोर उभी राहते. तशीच प्रेमळ, थकलेली.
.
अशी कितीतरी माणसं आगंतुक पावसाच्या धारेसारखी आपल्या आयुष्यात येतात आणि निघून जातात, पण आपल्याजवळ राहतो आठवणींचा ठेवा. पहिल्या पावसाचा मृदगंध जसा आपल्याला धुंद करून सुखावून जातो, तशाच मनाच्या अंतरंगात दडलेल्या गणगोतांच्या असंख्य आठवणी बेभान करतात.
शब्दात मांडण्यासारख्या आणखी खूप आठवणी असल्या तरी आता शब्दमर्यादेमुळे इथेच थांबते.
अशाच प्रेमळ, नि:स्वार्थी माणसांच्या मायेच्या आठवणीवर जगायचं असतं. याला जीवन ऐसे नाव..!