- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments
पूर्वी मीं मुलांना सुट्ट्या लागल्या कीं कांहीं दिवस माहेरी जायचे. मुलांना घेऊन जात असल्याने दिवसाचा प्रवास सुरक्षित वाटायचा. ठाण्यावरून सकाळी 9.30 ची कोयना एक्सप्रेस निघाली कीं रात्री 7.30 ला गावी पोहोचायची. रेल्वेचा प्रवास मुलांना फार आवडायचा. खिडकीतून दिसणारा खंडाळा घाट, दाट झाडीने अच्छादित दऱ्या, डोंगर , बोगदे, गाडीच्या वेगाबरोबर पळणारी झाडें, चायवाला, वडापाव वाला त्यांचे ओरडणे, बाजूला बसलेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख होणे मग गप्पा. बाईचे वय कितीही होवो तिची माहेरची ओढ कधीच संपत नाही.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मीं मुलांना घेऊन गावी जात होते. उजव्या बाजूला बाकड्यावर एक स्त्री, तीन मुली व एक छोटा मुलगा आणि तिचा नवरा असे सर्वजण ठाण्याला चढले. मुलींच्या हातात पिशव्या, बायकोने एका काखेत मुलाला घेतलेले, दुसऱ्या हातात बॅग घेऊन कशीबशी चढली. तिचा नवरा पण बॅग घेऊन चढला. हळूहळू सर्वजण स्थानापन्न झाले.समोर समोरच्या सीट्स त्यांनी रिझर्व्ह केल्या होत्या. तिन्ही मुलींनी हातातील पिशव्या सीट खाली व्यवस्थित ठेवल्या आणि गुपचूप बसल्या, त्यांच्यासमोर नवराबायको व छोटा मुलगा बसले. मुली एकमेकींमध्ये कांहीं कुजबुज करू लागल्या तर त्यांचे वडील त्यांच्यावर जोरात ओरडले “काय चाललंय मघापासनं बडबड बंद करा नायतर हितच सोडून जाईन ” त्या बिचाऱ्या सस्यासारखे अंग आकसून गुपचूप बसल्या.
मुलगा खिडकीतून हात बाहेर काढून वडिलांना आयस्कीम मागू लागला. वडलांचा चेहरा कौतुकाने ओसंडून वाहू लागला “सोमा बाळा तुला देतो बर” लगेच त्या आयस्क्रीम वाल्याला बोलाविले आणि त्याला घेऊन दिले तो पण मिटक्या मारत ते खाऊ लागला.मुली बिचाऱ्या आधाशी नजरेने नुसत्या पाहत होत्या. मला तर त्या माणसाची चीडच आली मुलींना का नाही दिले त्याने आईस्क्रीम. मुलगा हळूहळू सीट वरून उतरून दंगा करू लागला मुलींच्या खोड्या काढू लागला. पण त्याला वडलांनी जरा पण धाक दाखवला नाही. बाईने बॅग खाली सरकवली. आणि एका पिशवीतून मुलींना खाऊ देण्यासाठी डबा काढला. मुलाने डबा खसकन ओढला त्यामुळे त्याचे झाकण उडून त्याच्या पायावर पडले थोडेसे लागले त्याला तर जोरात भोकाड पसरले त्याने. त्याला दुखावल्याने वडिलांचा पारा वर चढला त्याने फाडकन बायकोच्या थोबाडीत मारली. ती बिचारी आतल्या आत रडू लागली. इतक्या लोकांसमोर मारल्याने बिचारीला मेल्याहून मेल्यासारखे झाले.
तिन्ही मुली खूप घाबरल्या बिचाऱ्यांना भूक लागली होती. तरी काहीच बोलू शकत नव्हत्या. मीं पण मुलांना प्रवासात खाण्यासाठी खाऊ घेतला होता. तो काढला मुलांना दिला आणि कागदी प्लेट मध्ये काढून मुलींना पण दिला. मीं दिल्याने त्या माणसाला कांहीं बोलता येईना. त्या एकदा माझ्याकडे एकदा वडिलांकडे बघू लागल्या न जाणो वडिलांनी आईसारखेच मुस्काडीत मारले तर. हे ओळखून मीच म्हंटले खावा ग मुलींनो भूक लागली असेल ग बरेच लांब जायचे आहे ना. असे म्हंटल्यावर त्यांना हायसे वाटले असल्यामुळे त्यांनी खाऊ पटापट संपवला. आमच्या छोट्यांचे टाईमपास करत गप्पा मारत खाणे चालूच होते.
ती बाई शेलाट्या बांध्याची कस्टाने थकलेले शरीर, नवरा नुसता माजलेला पोळ दिसला. आईच्या डोळ्यात मला कृतज्ञता दिसली. नवरा वरच्या सीट वर जाऊन आरामात झोपला. जणू कांहीं मुलांची सर्व जबाबदारी बायकोचीच होती. दुपार झाली पुणे स्टेशन आले. ट्रेन अर्धा तास थांबणार होती. छोट्या मुलाने वडिलांना हाक मारून उठवले. तो आळस देत उठला. खाली उतरला पण बायकोला विचारले पण नाही तुम्हाला कांहीं आणू का खायला. तो गेल्याचे पाहून तिने एका पेपर वर चपाती आणि उसळ काढून मुलींना दिली आणि म्हणाली खावा ग बाळांनो पोटभर. आणि मुलाला भरवू लागली.
तिचा नवरा बाहेर गेलेला पाहून मीं तिला विचारले तुम्हाला एक विचारू काय? ती म्हणाली विचारा कीं ताई. “काय ग तुझी चूक नसताना तूझ्या नवऱ्याने तुला सर्वांसमोर मारले त्याचा तुला राग नाही आला का ग. तू प्रतिकार का नाही केलास? ” इतका वेळ थांबविलेले अश्रू तिच्या डोळ्यातून वाहायला लागले आणि म्हणाली “ताई कसला प्रतिकार करता कुठं जाणार तुमच शहरातल्या शिकलेल्या बायांचं बर असत. तुम्ही ऑफिसात जाता पैसे कमवता आमचं आयीबान एकदा लगीन लावलं कीं त्याच्याबरोबरच जिन्दगी घालवायची मसणवटेला जाईस्तोवर, काय करणार पदरात पोरी हायेत त्यास्नी मातुर शिकवीन.
मी बी घरातलं करून शेतावर राबते. चार पैक कनवटीला लागत्यात त्यातलाच चोरून पोरींसाठी साठवते. नवरा मारतो. पण डोक्यावर छप्पर हाय. दोन येलचा घास मिळतोय. आमच्याकड कस म्हणत्यात पायातली व्हान पायातच ठेवावी. ताई चपलाच जीन जगतो आम्ही सतत पायाखाली तुडवलं जातोय. तोंड दाबून बुक्यांचा मार सोसतोय. कधी म्हणून मायेचा शब्द नाय. पोरगा पाहिजेल म्हणून तीन पोरींना जल्म दिला. त्यांना बी पाण्यात बगतो. त्यांनी काय केलंय. बर भांडून जाणार तरी कूट. आई बा बी म्हातारं झाल्यात त्यांना कशाला तरास देवान एक मातुर बर केलंय बरका ताई सोसायची ताकत बाईला जरा जास्तच दिली असावी “.
तेव्हड्यात तिचा नवरा येताना दिसला म्हणून आम्ही बोलणे बंद केले. आणि सुन्न मनाने खिडकीबाहेर पाहू लागले. आपण किती सुखी आहोत. प्रेम करणारा नवरा आहे मुलगा, मुलगी भेद त्याने कधीच केला नाही. हवे नको ते विचारतो काळजी घेतो. आणखी काय हवे किती सुरक्षित जीवन जगतेय मीं.
ट्रेन हळूहळू गावी पोहोचली तिचा निरोप साश्रू नयनांनी घेतला. तिने पण पदराआड हळूच डोळे टिपले. मुले ट्रेन मधून खाली उतरली. मामा स्टेशन वर न्यायला आला होता त्याला बिलगली. हळूहळू ट्रेन कोल्हापूर च्या दिशेने पुढे गेली. माझे मन तिच्याभोवती तिच्या मनाचा ठाव घेत राहिले. मदर इंडिया चे गाणे मनात गुंजत राहिले, “दुनियामे हम आये है तो जिनाही पडेगा, जीवन अगर जहर है तो पिनाही पडेगा “.
तिथे सावकाराच्या पाशातले स्त्री चे वर्णन होते इथे पुरुषप्रधान संस्कृती आणि अत्याचाराचे चित्र डोळ्यासमोर आले. माहित नाही स्त्री चा प्रवास कधी सुखकर होईल.
सौ चित्रलेखा शिंदे