“ती”

सौ.मीनल सावंत
 
 
ती…….अगदी जन्माला  आल्यापासून सर्वांची लाडकी! सगळ्यांच्या गळ्यातला जणू ताईत! तिचे सारे हट्ट पुरवणे, खूप लाड करणे हे ठरवून दिल्याप्रमाणे घडत होतं. 
.
ती कधी मोठी झाली हे कळलंच नाही तीला. आता  मात्र हळूहळू बंधनं यायला लागली. इथे जाऊ नकोस, वेळेतच घरी ये, हे बरं दिसत नाही, ते करू नकोस, आपल्या घराण्याच्या आणि आई-वडिलांच्या नावाला कुठेही डाग लागता कामा नये याची काळजी घे वगैरे वगैरे. तिला आपल्यावर आलेल्या जबाबदारीची जाणीव झाली. आणि बघता बघता तोलामोलाचं, साजेसं स्थळ पाहून तिची पाठवणीही झाली‍️‍. 
.
त्या नव्या वातावरणात बावरलेली असूनही ती आनंदात होती. साऱ्यांना जपत होती. हळू हळू साऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊन सगळ्यांच्या मनासारखं करणं तिला जमायला लागलं होतं.  ती अगदी आवडीने हे सारं सांभाळत होती. सासू-सासर्‍यांचे करतांना, मनात प्रेम होतंच पण कर्तव्यभावना जास्त होती. आणि त्यांच्याकडूनही तिला प्रेम मिळत होतं.  पण हे तुझं कर्तव्य आहे याची जाणीवही तिला करून दिली जात होती. नवरा!! हो…ज्याचा हात विश्वासानं  धरून आली तो…   त्याच्याबरोबर तर ती अगदी दुधात साखर विरघळते तशी विरघळून गेली. तिच्यावाचून त्याचं पानही हलेना आणि तीही त्याच्या मागे-पुढे करण्यात स्वतःला धन्य समजत गेली.                    
.
आपल्याला दुसरं काही करायचं आहे किंवा वेगळं काही आपलं अस्तित्व आहे हेच ती विसरली. तिच्या हसण्याने, बोलण्याने, सदा आनंदित राहण्याने सारे घर अगदी फुलून गेलेलं असायचं. हळूहळू तिला या साऱ्याची सवय झाली. साऱ्यांच्या आवडी-निवडी जपत असताना स्वतःला काय आवडतं हेच ती विसरली. हो… तसंही तिला कधी कोणी विचारलंही नाही तुला काय आवडतं ते!
.
आता एवढ्या दिवसांनी हे सगळं असं मनात का यायला लागलंय बरं तिच्या???     तू दमलीयस का?, आज हे खूप छान झालं होतं बरं. तु करतेस ते सगळं वेगळंच असतं…..  असं काहीही होत नव्हतं. आपलं कोणी भरभरून कौतुक करावं. आपल्यावरही कोणी प्रेमाचा वर्षाव करावा. निदान तू होतीस म्हणून- तू आहेस म्हणून …हे शब्द तरी ऐकायला मिळावेत!!  आता असं का वाटतंय तिला? या साऱ्याची सवय झाली नाही का तीला अजून? आतल्या आत तिचं मन का कुरतडतंय? का हळवं झालंय ?  चांगलं चाललंय की सारं. कशाला नसत्या खपल्या काढायच्या? 
.
तिच्या वयाच्या बऱ्याच  जणींचं हे दुःख असेल . पण असं नको !!! झाकली मुठ सव्वा लाखाची नाही काॽ जे आजवर चाललं आहे तेच छान आहे. इतक्या वर्षात खूप हिंडलो फिरलो, एकमेकांना जपलं, सारं सुख मिळालं की!!. आता शेवटाकडे चाललोय. आता कशाचं दुःख करायचं? उगाच कुणाला दुखवायचं?  आहे त्यात समाधान मानायचं. नसत्या आशा अपेक्षा बाळगून आपण स्वतः दुःखी होणारच पण समोरच्यालाही दुःख देणार. त्यापेक्षा जे होतं ते छान होतं, आणि जे आहे ते सुंदर आहे. उगाचच भावना, आपुलकी अशा मोठमोठ्या शब्दांना भुलायचं नाही. मी खूप खूप सुखी आहे! समाधानी आहे! आनंदी आहे! असंच मनाला सांगायचं आणि समाजात देखील वावरताना चेहऱ्यावर पांघरलेला हा मुखवटा तसाच ठेवायचा म्हणजे सगळीकडे आनंद, समाधान, सुख ओसंडून वाहतंय असंच दिसेल. आत्तापर्यंत सगळ्यांना आपला हेवा वाटला असा समज कायम ठेवायचा,नाही का? 
.
मला वाटतं  प्रत्येक “ती” ‍अशीच आहे.म्हणूनच ती सुखी,आनंदी आहे. अशा या “ती” ला त्रिवार सलाम ! ! ! 


Leave a Reply