नमस्कार मैत्रिणींनो, आजचा विषय आहे कर्तुत्ववान स्त्री व्यक्तिरेखा. बुरसटलेल्या कल्पनांनी, आचार-विचार आणि रितीरिवाजांनी, समाजाची अवस्था चिखलात रुतलेल्या रथासारखी झाली होती़. समाजाचा रथ अज्ञानात, अनिष्ट चालीरीती आणि आचार-विचारात रुतून बसला तर समाजाच्या अधोगतीला पर्याय नव्हता. काही वर्षापूर्वी आपला समाजही अशाच अंधकार युगात होता. स्त्रीची अवस्था दावणीला बांधलेल्या गायी सारखीच होती. अशा कालखंडात, एखादी साध्वी पतिव्रता आपल्या कार्याने समाजाला प्रकाशाच्या मार्गाकडे घेऊन जाते. अशी अनेक स्रीरत्ने महाराष्ट्र भूमीत जन्माला आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यादेखील अशाच काही रत्नां पैकी एक. सावित्रीबाईंना लिहिता वाचता येत नव्हते. पण ज्योतिबा फुले शाळेत जायचे, त्यांची पुस्तके घेऊन त्या त्यातील चित्रे पहात. ज्योतीबांनी हळूहळू त्यांची आवड लक्षात घेऊन, त्यांना लिहायला वाचायला शिकविले.
.
माणसांमाणसांमधील जातीवरून होणारे मतभेद, उच्च-नीच ठरविणे हे त्यांना मानवत नव्हते, उच्च वर्गातील लोकांनी केवळ स्वार्थापोटी त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. परंतु काही माणसे ध्येयवेडी असतात. आपले ध्येय गाठण्यासाठी अविरत परिश्रम, अपार कष्ट, आणि अपमान सहन करीत सावित्रीबाई त्या काळात शिक्षण घेत होत्या. स्री हा घराचा मध्यबिंदू असतो. स्रीशिक्षणाने घर सुधारते. स्त्रियांची प्रगती होते. सावित्रीबाई मनापासून आनंदाने शिकत होत्या आणि नंतर इतरांनाही शिकवू लागल्या. ज्योतिबांनी त्यांना वेगवेगळे हिंदू ग्रंथ, कबीराचे दोहे, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा यांचे वाचन आणि अर्थ अभ्यासपूर्ण शिकवले. त्या इतर स्त्रियांना शिकवायला लागल्यामुळे समाजावर मोठे संकट येईल,असे वाटून लोकांनी खूप त्रास दिला. त्यांच्यावर दगडफेक, चिखलफेक सुद्धा केली. तरीही त्या घाबरल्या नाहीत. सावित्रीबाईंच्या अशा धीरोदात्तपणामुळे, जुन्या विचारसरणीच्या उच्च वर्गातील लोकांचा संताप अनावर झाला. विधवा, बोडक्या स्त्रियांच्या ‘नरकयातना’ जीवन, त्यांच्यावरील अत्याचार, त्यातून जन्माला येणारी मुले त्या स्त्रिया कुठेही टाकून देत. अशांसाठी त्यांनी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू करण्याच्या उद्देशाने आश्रमही काढला. त्या स्त्रियांनाही आश्रमातच ठेवून मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. त्या अनाथ मुलांच्या माता बनल्या.
.
दलित कनिष्ठ वर्गातील लोकांना पाण्यासाठी नेहमीच हाल सोसावे लागत.वरिष्ठ वर्गातील लोक त्यांना विहिरीचे पाणी देत नसत. ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला. हेच त्यांचे कृतीशील पाऊल. पुढे त्या दोघांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. “जाचक रूढी, परंपरा, चालीरीतींचा त्याग करून माणसाने माणसासारखे वागावे. आपण सर्वजण एकाच परमेश्वराची लेकरे आहोत. म्हणून सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदावे” यासाठी हा समाज स्थापन केला.आपल्या अनुसूचित जाती जमातीतील स्त्रियांना, लहान मुलींना शिक्षण मिळावे आणि अनैतिकतेची जाणीव व्हावी, सुशिक्षित व सुजाण नागरिक बनाव्यात हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. यासाठी त्या आयुष्यभर झटल्या.
.
सावित्रीबाईनी आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत आपले कार्य चालू ठेवले. म्हणून एक महान साध्वी सावित्रीबाई म्हणजे समाज सेवेची अखंड तेवणारी ज्योत होय. म्हणूनच लोक त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणत, त्यांच्या स्मृतीला शतशः प्रणाम!!
शब्दांकन: सौ.वंदना लोटणकर