“बंदिनी स्त्री ही.. हृदयी पान्हा नयनी पाणी जन्मोजन्मीची कहाणी ” हे काव्य कर्मठ संस्कृतीतील काही स्त्रियांच्या , चूल आणि मूल सांभाळत पुरुष प्रधान संस्कृतीचे अत्याचार झेलणाऱ्या स्त्रियांना लागू होते. पण त्याच कर्मठ संस्कृतीत आनंदी गोपाळ जोशी, पंडिता रमाबाई अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्या आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा पार इतिहासात नोंदवला. स्त्री ने एकदा काही करायचं ठरवलं तर कितीही संकटांचा सामना करत अतिशय कसोशीने ती आपले ध्येय पूर्ण करते. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘ सुभासिनी मिस्त्री ‘. कदाचित हे नाव कित्येकांना अपरिचित असेल पण सुभासिनी मिस्त्री ह्या दुर्गाशक्तीच्या कर्तृत्वाची गाथा वर्णावी तेवढी थोडीच……
.
सुभासिनी मिस्त्री यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. घरच्या गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेता नाही आले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना लग्नाच्या बोहल्यावर चढवले गेले आणि अवघ्या बारा वर्षांचा संसार आणि चार मुलं पदरात असतानाच त्यांच्या पतीचे निधन झाले. अतिशय गरिबी आणि पैशाचा अभाव ह्यामुळे वेळेवर हॉस्पिटल मध्ये प्रवेश न मिळाल्याने त्यांच्या पतीचा हकनाक बळी गेला. त्याच क्षणी सुभासिनी मिस्त्री यांनी हॉस्पिटल काढण्याचं आपलं ध्येय निश्चित केलं.
.
ज्या गावात त्यांच्या पतीचा मृत्यू झाला त्याच गावात हॉस्पिटल काढेन असं तिने गावातील लोकांना निक्षून सांगितले.अवघ्या २३ व्या वयात चार मुले पदरात असताना त्यांना समाजाची अवहेलना पत्करावी लागली परंतू त्या आपल्या ध्येयापासून हटल्या नाहीत. सुरवातीला लोकांची धुणी भांडी करून त्यांनी थोडे पैसे जमवले,भाजी विकण्याचा उद्योग स्विकारला आणि बँकेत आपलं खातं उघडलं. हे सगळं त्या वीस वर्षे करत होत्या. अखेर १९९२ मध्ये त्यांनी त्याच गावात १०,०००/- रुपयांना जमीन विकत घेतली आणि त्या जागेवर हॉस्पिटल काढायचे निश्चित केले.त्याच गावातील लोकांनी हॉस्पिटल उभारणीसाठी योगदान द्यावे असे आवाहन केले आणि बघता बघता ‘ लोग जडते गये और कारवाँ बनता गया ‘ हे दृष्य समोर आलं. त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलाला डॉक्टर बनवले. बघता बघता ह्या हॉस्पिटललाअनेक संस्थांचा हातभार लागला आणि हे हॉस्पिटल नावारूपाला आलं.
.
आज हे हॉस्पिटल सोनोग्राफी, एक्स रे , ऑपरेशन थेटर तसेच इतर विविध उपकरणांनी समृद्ध आहे,ज्याचा उद्देश प्रत्येक माणसाला वैद्यकीय सेवा देणे हाच आहे. ऐन उमेदीच्या काळात पतीचं छत्र नसताना अत्यंत गरिबीत चार मुलांना वाढवून,योग्य शिक्षण देऊन आपली सगळी पुंजी पणाला लावून एवढं मोठं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं हे खरंच खूप मोठं आव्हान आहे.कधी कधी कर्तृत्वाची उंची एवढी असते की त्यामुळे पुरस्काराचे वजनही वाढते.
.
वयाच्या ७५ व्या वर्षी सुभासिनी मिस्त्री ह्यांना माननीय राष्ट्रपती कोविंद यांच्याकडून पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारतानाही त्या अत्यंत साधी साडी आणि स्लिपर ह्या वेशात होत्या म्हणजे ह्यावरून त्यांच्या साधी राहणी आणि उच्च विचार सरणीचे दर्शन होते.स्त्रीकडे आत्मविश्वास असेल तर ती स्त्री कोणाच्याही आधाराशिवाय आपली स्वप्न पूर्ण करू शकते हे सुभासिनी मिस्त्री यांनी सिद्ध केले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीशी सामना करत त्यांनी आपले ध्येय पूर्णत्वाला नेले .सुभासिनी मिस्त्री यांच्या कडून खूप काही आत्मसात करण्यासारखे आहे. त्यांच्या कडून प्रेरणा घेऊन प्रत्येक स्त्रीने आपली स्वप्न पूर्ण करून आपण ही समाजाचे देणं लागतो हे सिद्ध केले पाहिजे.
.
आयुष्यात खूप काही करण्यासारखे आहे फक्त एक ध्येय आणि ती पूर्ण करण्यासाठी एक चिकाटी आपल्या अंगीकृत असावी लागते. सुभासिनी मिस्त्री ह्या कर्तृत्ववान नारीशक्तीला मानाचा मुजरा करून समस्त महिलांसाठी माझी एक छोटीशी काव्य सुमनांजली……
.
*कर्तृत्वाचा ध्यास तुझा*
*साऱ्या जगाला दाखव*
*नवे संकल्प, नवी आस*
*नव्या आव्हानांना मनी* *जागव….*
*विधात्याची कलाकृती तू*
*नको नाकारुस तुझे अस्तित्व*
*झुगारून खोटी बंधने*
*जपून ठेव तुझ्यातील स्वत्व…..*
*मुक्तांगण हे तुझे सजावे*
*जाणिवांच्या मोकळ्या हवेत*
*स्वप्न उरात बाळगताना*
*आभाळ असेल तुझ्याच* *कवेत….*
.
शब्दांकन: सौ.शिल्पा भोसले.