आपण फार भाग्यवान आहोत ज्यांना जिजाऊ, झाशीची राणी, डॉ. आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले ह्या आणि कित्तेक स्त्रियांचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभाव पडला आहे. त्यांचा विचाराने, अनुभवाने जीवनाला एक दिशा मिळते. ह्या सगळ्या महान कर्तृत्ववान स्त्रियांमध्ये एक सामायिक बाब होती ती म्हणजे त्यांची चिकाटी, धैर्य आणि बंडखोर वृत्ती. अशीच एक वर्तमानातील व्यक्ती ज्यांच्या बद्दल वाचलं, त्यांना ऐकलं आणि त्यांना पाहताक्षणी ती व्यक्ती आपलीशी वाटली त्या म्हणजे सौ. सुधा नारायण मूर्ती.
भारतातील कदाचित पहिल्या महिला इंजिनियर. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंजिनीयरिंग क्षेत्रात केवळ नोकरी संधर्भातील एका पत्रकाच्या शेवटी लिहलेली टीप त्यांना खटकली. ती होती– “लेडी कॅन्डिडेट्स नीड नॉट अप्पलाय“. ह्या संदर्भात त्यांने सरळ कंपनी चा मालकांना म्हणजे खुद्द जे. आर. डी. टाटा ह्यांना पोस्टकार्ड पाठवून त्यांचा कंपनी च्या पुरुष धार्जिण्या विधानावर आक्षेप व्यक्त केला. लिंगभेदाचा उल्लेख ज्या स्त्रीला खटकला, त्या स्त्रीला स्वतः च्या बुद्धिमत्तेवर आणि कर्तृत्वावर प्रचंड विश्वास होता. आणि म्हणूनच त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला आपले विचार व्यक्त करता आले पाहिजे. सुधाताईंचा मते चांगल्या विचारांचे, गोष्टींचे मिळालेलं स्वातंत्य्र हि आयुष्यातील सर्वात मोठी चैनेची वस्तू आहे.
सुधाताईनं पुढे बरेच यशस्वी टप्पे पार केले, पण त्यांचा मुलीच्या एका प्रश्नाने त्यांचे जीवन पार बदलून गेले. वयाच्या ४५ वर्षी त्यांचा मुलीने त्यांना विचारले– “अम्मा, तुझा जीवनाचं नेमकं उद्दिष्ट काय आहे?”. ह्या वयात साधारणतः पालक मुलांना हा प्रश्न विचारतात, पण मुलीने विचारलेल्या प्रश्नावर त्यांने आठ दिवस खुप विचार केला आणि कॉम्पुटर सायन्स च्या लेक्चरर पदाचा राजीनामा देत सगळा वेळ गरीबातल्या गरीब लोकांसाठी खर्च करू लागल्या. एका प्रश्नानं जीवन बदलून जाणं काय असतं हे आपण त्या प्रश्नाकडे कसे पाहतो ह्यावर खूप अवलंबून असतं.
सुधाताईंवर माननीय जे. आर. डी. टाटांचा खूप प्रभाव आहे. खुद्द टाटांनी त्यांना कानमंत्र दिला,”जेव्हा खूप सारे पैसे कमावशील तेव्हा समाजासाठी ते खर्च कर, कारण त्यांचा प्रेमानेच तुझा उद्दिष्ट साध्य झालं असेल“. देण्याची भावना खूप मोठी आहे , त्याचा देखावा नसावा. मनाच्या तळातून जेव्हा ही भावना उचंबळून येते, तेव्हा ती निःस्वार्थी असते.
पद्मश्री पुरस्कारासारखे कितीतरी प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत, पण त्यांची राहणी अतिशय साधी आहे. बाह्य दिखाव्यावर भुलून आर्थिक परिस्थिती चा अंदाज लावणाऱ्यांसाठी हे चोख उत्तर आहे. सुधाताई एक उत्तम लेखिका, वक्त्या, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या समाजातील तळागाळातील लोकांसाठी शिक्षण, सार्वांजनिक स्वच्छता, ग्रामविकास इत्यादी कार्यांसाठी त्या कार्यशील आहेत. त्यांनी ह्या सगळ्या प्रवासात त्यांचा पतीला भक्कम साथ देत स्वतः ची एक आगळी वेगळी ओळख देखील बनवली, जी फार उल्लेखनीय आहे. मनाला गर्वाची बाधा जर शिवली तर त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्या वर्षातून काही काळ वेंकटेश्वर मंदिरात जाऊन श्रमदान करून आपल्या कर्तव्याची जाणीव परत ताजी करतात.
“आयुष्य एक परीक्षा आहे, त्याची प्रश्नपत्रिका माहीत नाही, उत्तरपत्रिकेचे नमुने पण हाताशी नसताना काही नियम जर आपण स्वतःला घातले तर आयुष्य सोप्पं होऊन जाते.” सुधाताई पुढे म्हणतात, “तुम्ही एकाच वेळी अनेकांना खुश ठेवण्याचा प्रयत्नात एकालाही खुश ठेऊ शकत नाही. आग कधी आगीने विझत नाही, त्याला पाण्याचीच गरज लागते. चांगले नाते–संबंध, मानसिक शांतता हि मोठ–मोठ्या पुरस्कारांपेक्षा फार मोलाचे आहेत. तुम्ही किती बुद्धिमान आहेत किंवा तुम्ही किती धनवान आहात हे महत्वाचे नसून तुम्हाला यशस्वी बनण्यासाठी ध्येयाचा ध्यास आणि चिकाटी तुम्हाला यश देईल. स्वतःवर विश्वास ठेवा,स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. तुम्ही यशस्वी नक्की व्हाल“.
मी स्वतःला भाग्यवान समजते सुधाताईंसारख्या स्त्रिया आपल्या भारतभूमिमध्ये जन्माला आल्या आणि त्यांचा आदर्श आपल्या समोर ठेवला. माझ्या भारतातल्या सर्व कर्तृत्ववान महिलांना माझा मानाचा मुजरा.
सौ . शिल्पा नलावडे