शब्दांकन…..
सौ.चित्रलेखा शिंदे.
.
मे म्हईन्याचं रणरणतं ऊन, सूर्य निस्ता आग वकत व्हता. काल सांगावा आल्यापास्नं राधिच्या जीवाला थारा नव्हता. श्रीपती दादाचा फोन आला व्हता कि, आण्णांना जास्त झालंय अन तुझा जोसरा काढलाय. तू असशील तशी निघ. तुझ्यात जीव घुटमळलाय, तुझ्या वाटकडं डोळं लावून बसल्यात. बातमी ऐकली आणि तिच्या हाता पायातनं जीव गेल्यागत खाली बसली. मालकाला म्हणाली, ” आता वो काय करू? कशी वो जाऊ म्या? एसटी बंद हायती, कंचंबी व्हान चालू नाय, कशी काय जाऊ म्या? अण्णा तिकडे माझ्या वाटेकडं डोळं लावून बसल्याती. असं करा, आता पोरं कळती हायती, दोन दिस सांभाळून घ्या. म्या जर आत्ता चालत निगाली तर सांजच्या पात्तूर पोचन.असं म्हणत चार पातळं आणि झम्पर पिशवीत घातली, पान्याची बाटली घेतली अन् मनाशी ठरीवलं कि आता चालत निघायचं. मालक म्हणालं, “अगं राधे मी बगीन पोरांकडं, पर तू कशी जाशील गं एकलीच पायाचं तुकडं पडत्याल कि. म्या म्हणलं अवो पडूद्यात तुकडं, ते भैय्या लोक किती लांब चालत गेल्यात पोरंबाळं घेउन, तिकडं माझा बा वाटंकडं डोळं लावून बसलाय मला जाया पायजेल. असं म्हणून तीनं पदर खोचला, पोरांना जवळ घेतलं आणि समजावलं “हे बगा रं मी येईसपातूर बाबांना तरास द्यायाचा न्हाय, म्या येतीच लगोलग माघारी”. अन् रस्ता धरला.
.
राधेने हायवेच्या बाजूबाजूने चालायला सुरुवात केली. उन्हाचा कहर. एकटीने चालायचं, पण तिच्या अंगात बळ आलं आणि ती झपझप चालायला लागली. सगळीकडे शांतता, एखादा पक्षी उडताना दिसे. वारा अजिबात नसल्यामुळे झाडे निस्तब्ध. चालता चालता राधेला लहानपण आठवायला लागलं. राधेला मोठा भाऊ श्रीपती आणि राधा धाकटे शेंडेफळ, अण्णांचा पहिल्यापासून लय जीव होता तिच्यावर, शाळेत पहिला नंबर कधीही सोडला नाही. अंगात जरा हट्टीपणा होता, शकूच्या कानातलं डूल बघितल्यानंतर अण्णांच्या मागंच लागली. मला बी तसंलच डूल पाहिजेत. मग काय लेकीचा हट्ट पुरवण्यासाठी आण्णांनी दोन पोती धान्य बाजारात नेऊन इकलं आणि राधेला डूल आणलं. एकदा रात्रीच्या पारी गल्लीतनं येताना किरडू चावलं. अंगाचा नुसता जाळ झाला. राधी नुसती वरडत व्हती. अण्णांचा जीव घाबराघुबरा झाला. राधेला दोन्ही हातावर घेतलं आणि सरकारी दवाखान्याकडं पळत सुटलं. डॉक्टरनं इंजेक्शन दिल्यावर उतार पडला. आणि राधेचा जीव वाचला.
.
अण्णा सकाळी लवकर उठत. जनावरांना वैरण घालत. त्यांच्या धारा काढत. आणि मग न्याहारी करून शेतावर जात. आई मग सडा-सारवण, रांगोळी, देवपूजा मग स्वयंपाकाला लागायची. सैपाक म्हणजी काय भाकरी आणि पातळ कालवण.
शेत हाकंच्या अंतरावर असल्यानं अण्णा दुपारी जेवायला घरीच यायचं. जेवण झाल्यावर जरा लवंडायचे. मग परत शेतावर जाऊन दिसभर राबायचे. हिरवंगार शिवार बघितलं की त्यांला प्रेमाचं भरतं यायचं. पीक काढणीच्या वेळेला हाताशी मजूर घ्यायचे, धान्य काढायचं ,पोती भरायची. धान्याची खोली भरले की अण्णांना कष्टाचे फळ मिळाल्याचं समाधान मिळायचं. घरात लागणाऱ्या वर्षभराचं धान्य घरात ठेवून बाकी बाजारात इकायचं त्यावर वर्षभरातच मीठ,तेल, कपडालत्ता यांचा खर्च चालायचा. चैत्र पुनवंला सीदोबा ची जत्रा असायची. लई गर्दी असायची म्हणून अण्णांचा शरट धरून समद्या जत्रेत फिरायचे. अण्णा मला जिलबी, बत्तासं, चिवडा घेऊन खायला द्यायचं. खेळण्यातला डमरू वाजवणारं जोकर, भातुकलीची लहान भांडी हट्टानं घ्यायचे. रातच्याला पुरुष मंडळी कनातीत तमाशा बगाया जायची ती कोंबडा आरवला कि घरी यायची.
.
बायाबापड्या मातुर देवळात बुवांच्या कीर्तनला जायच्या. हळूहळू वय वाढत गेलं. बारावीनंतर आण्णांनी शिवण क्लासला घातलं. त्यांचं म्हणणं असायचं आयुष्यात कुणालाबी कोणती वेळ येती. तवा स्वतः कमवता आल पाहिजे. कालांतराने एसटी कंडक्टर असलेल्या यांच्याशी माझं लगीन झालं. लग्नात अण्णांनी शिलाई मशिन घेऊन दिलं. मी शिलाई काम करून चार पैशाची मदत संसाराला करते. अण्णांनी मात्र बऱ्याच वेळला मला म्हणून दावलं. अग राधे मला जरा वाडीला घेउन जा कि गं. पण संसाराच्या ऱ्हाटगाडग्यातनं अण्णांची इच्छा पूर्ण करता आली न्ह्याय हे माझ्या मनाला लईच लागून ऱ्हायलं. सूर्य मावळतीला चालला. चालून चालून लई थकायला झालं. जरा झाडाखाली बसले, घटाघटा पाणी प्यायली, जरा बरं वाटलं हुशारी आली. झटपट चालाय लागले. गावाची वेस दिसल्यावर जरा जीवात जीव आला. अण्णांचं घर दिसलं तशी घरात धावतच गेले. अण्णा बिछान्यावर निपचित पडलेले. आई त्यांच्या बाजूला बसलेली. दादा वहिनींच्या चेहऱ्यावर चिंता. पहिले मी अण्णांच्या जवळ गेले. हातात हात घेतला. हात थंड पडलेला. अंग गार पडायला लागलेलं. त्यांना हाका मारल्या तेव्हा त्यांनी कष्टाने डोळे उघडले आणि राधेकडं बगितलं आणि त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या, जणू तिचीच वाट बघत प्राण अडकून राहिला होता. अण्णांनी एक हुंदका दिला आणि हातात हात घेतला. खूप बोलायचं होतं त्यांना पण त्यांच्या अंगात त्राण नव्हते. स्पर्शातून खूप काही सांगून गेले. वहिनीने चहापाणी दिले. हळूहळू अण्णांचा हात हातातून सुटला. आणि त्यांनी डोळे मिटले ते कायमचेच. जणू काही राधी येण्याचीच वाट बघत बसले होते ते. आईच्या गळ्यात पडून खूप रडले. आई रडताना म्हणत होती, “कशी आलीस गं बाई? लई चालायला लागलं तुला. तुझ्या वाटंकडं डोळं लावून बसलं होतं.”
.
मग गावातले लोक जमले. सर्व विधी झाले. तिसरे दिवशी माती सावडल्यावर,
मी आईला म्हटलं, मी तुला बरोबर न्हेलं असतं गं पर आता कोणतं बी व्हान चालू नाय. चालू झालं कि नेती. मला आता परत माघारी फिराया पायजे. माझी लेकरं तिकडं वाट बघत असत्याल. दादा मला जाताना जरा अण्णांच्या अस्थी दे रे. दादांनं सगळं रितीरिवाजाप्रमाणे व्यवस्थित केलं. सकाळी लवकर उठून परतीचा प्रवासाची वाट धरली. लेकरांच्या ओढीनं पाय पटापटा उचलायला लागले. निघताना दादानं थोड्या अस्थी दिल्या होत्या. जाताना थोडी वाकडी वाट करून वाडीला गेले. समोरनं संथ वाहणारी कृष्णामाई बघून मन भरून आलं.
.
अण्णांच्या अस्थींना नमस्कार केला आणि घाटावर जाऊन फुले वाहिली आणि त्या नदीच्या पात्रात सोडल्या. थोडावेळ शांत बसले म्हंटलं आण्णा मला माफी करा तुमी मातूर आमचं सगळं हट्ट लहानपणी पुरवायचात पण तुमचा एक हट्ट मला न्हाई पुरवता आला. तुमास्नी वाडीला नाय आणता आलं. तुमच्या सारखं वडील मला परतेक जन्मात मिळू देत हेच दत्ताकडं मागणी हाय आणि मुलगी म्हणून तुमच्याच पोटाला यावं असं बोलून तीनं अश्रूंला वाट मोकळी करून दिली.