सौ.प्राची पालव
.
प्रत्येकाचे आयुष्य हे विविध कडू /गोड आठवणींनी भरलेले असते. पण काही विशिष्ट आठवणी, प्रसंग आयुष्यात असे घडून गेलेले असतात की, आपण ते कधीच विसरू शकत नाही. कितीही प्रयत्न केला तरी शक्य नसते. माझ्याही आयुष्यात असे बरेच चांगले वाईट प्रसंग येऊन गेलेत. जीवनात आलेले चढ-उतार, चांगल्या-वाईट प्रसंगातूनच आपले आयुष्य पुढे मार्गक्रमण करत असते.
.
मी आता ज्या संस्मरणीय प्रसंगावर लिहीणार आहे , तो माझ्या आयुष्यातील ‘अनमोल ‘असा क्षण आहे. ज्या ज्या वेळेस आम्ही देवदर्शन प्रवासास निघतो, त्या त्या वेळी मला या प्रसंगाचे स्मरण होऊन मन उल्हसित होते. त्या आठवणीच्या हिंदोळ्यावरच आपण सुखावतो.
.
सन १९९६ सालातील घटना. माझ्या वहिनीला देवाज्ञा झाली. माझा भाऊ व त्याची मुले कोलमडून पडली. त्याची मुलगी आणि मुलगा, अजाणते वय,आईच्या विरहातून बाहेरच पडत नव्हते. माझ्या दोन मुलीही त्यांच्याच बरोबरीच्या असल्यामुळे,५-६ महिने उलटल्यावर त्याने मला सहज विचारले, आपण मुलांना थोडे फिरवून आणूया का ? आम्ही लगेच तयार झालो व २ दिवसातच एक गाडी ठरवून ‘गणपतीपुळे, पावस ‘जायचा बेत केला. या ठिकाणी आम्ही कधीच गेलो नव्हतो. कुठे,कसे फिरायचे, तिथल्या वेळा काहीच माहित नव्हत्या. आम्ही प्रथम ‘गणपतीपुळे’ला गेलो.तिकडचे देवदर्शन झाल्यावर ‘पावसला’ जायचे ठरवले. पावसला दुपारी साधारण १२ वाजता पोहोचलो. तिथे भावाला मुलाच्या हस्ते अभिषेक करण्याची इच्छा होती. तितक्यात गुरूजी म्हणाले अभिषेकाची वेळ संपत आलीय. लवकर जा.तिथल्या गुरूजींनी आम्हाला लगेच अभिषेक करण्यास बसवले. तो उरकल्यावर आरतीसाठी त्वरित सभामंडपात जाण्यास सांगितले. मी स्वामींचरणी वाहण्यासाठी प्रसादाचे ताट घेतले व मंचावर स्वामींच्या पादुकांपाशी ठेवून मागे जाऊन उभी राहिले. सभामंडप खचाखच भरलेला होता. पुरूषांसाठी / स्रीयांसाठी वेगवेगळी सोय होती.
.
थोड्या वेळात आरती सुरू होणार, इतक्यात मंचावरून गुरूजी हात करून बोलावत होते. इतक्या प्रचंड गर्दीत कुणाकडे अंगुली निर्देश करताहेत, हेच समजत नव्हते. निळ्या रंगाच्या साडीवाल्या बाईंना बोलवा असे म्हणाले. मी खूपच घाबरले. क्षणभर काय झाले कळेचना ! मला वाटले मी ताट ठेवण्यात काहीतरी चूक केली. घाबरत घाबरतच पुढे गेले. तेव्हा ते म्हणाले, वर मंचावर या व आजची आरती तुमच्या हस्ते करा. त्याच क्षणी माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू जमा झाले. मला जणू भेटायलाच ‘ श्री स्वामी स्वरूपानंदांनी’ बोलावून घेतले! इतक्या जड पंचारतींनी स्वामींना ओवाळतांना झालेला आनंद काय वर्णू? मनोमन स्वर्गसुख अनुभवले.
.
तिथल्या प्रथेप्रमाणे दुपारच्या आरतीचा मान एका महिलेला असतो, असे कळले. तो मान आकस्मिकपणे मला मिळाला यातच सगळे हर्षभरित झाले. आपली यात्रा सफल झाल्याचा अत्यानंद झाला. पावसला जाण्याची बरेच वर्षांपासूनची इच्छा, स्वामींनी जणू मला बोलावून घेऊन पूर्ण केली. भाऊ मला म्हणाला, तू संपूर्ण आयुष्यभर विसरणार नाहीस असा प्रसाद तुला मिळालाय! खरंच, अचानक केलेल्या या प्रवासाने मी कृतार्थ झाले. हा आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात खूप रंग भरून राहिलाय.
.
धन्य धन्य ते पावस !!