सौ. विजया शाहू साटम
पाल्म एकर्स सोसायटी
मुलुंड पूर्व
आपलं मुलुंड
आपलं मुलुंड!! या दोन शब्दांतच किती प्रेमभावना, आपलेपणा,आपुलकी व जवळीक आहे नाही? आपलं म्हणजे स्वतःच! आपल्या जवळचं! आपल्या जीवभावाचं वाटावं असं! हे जीवभावाचं नातं गेली त्रेचाळीस वर्ष मी अनुभवत आहे,जपत आहे!!
.
१९७७ साली वैशाख महिन्यातील अक्षयतृतीयेला आम्ही भांडुपवरून सहकुटुंब मुलुंडला पाल्म एकर्स सोसायटी मध्ये रहायला आलो आणि अवघे मुलुंडकरच झालो. खूप आनंद झाला. रखरखीत उन्हातून चालतांना अचानक वटवृक्षाच्या सावलीत गेल्यावर होतो तसा!
.
पाल्म एकर्स सोसायटी ही मुलुंडमधील पहिली सोसायटी. दहा ते बारा इमारती असलेली आणि खूप मोकळी जागा व भरपूर झाडे असलेली ही सुंदर सोसायटी! रेल्वे स्थानकापासून अवघ्या ७ ते ८ मिनिटांवर असलेली! स्टेशनपासून सोसायटी पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी झाडे! त्यामुळे रस्त्यावर भरपूर सावली असायची. तसे मुलुंडमध्ये सर्वच रस्त्यांवर अशी मोठमोठी झाडे होती. त्यातही गुलमोहराची आणि सोनमोहराची झाडे जास्तच! उन्हाळ्यामध्ये त्यांची ती भगवी आणि सोन्यासारखी पिवळी फुले पाहिली की त्या निसर्ग दर्शनाने मन अगदी बहरून यायचे!
.
१९७७ साली मुलुंडमध्ये फार इमारती नव्हत्या. सी.डी. देशमूख उद्यानाचा आराखडा सुरू होता. बाजूला सावरकर रुग्णालयाचे आणि तेथून १०-१२ मिनिटांवर केळकर महाविद्यालयाचे काम सुरू होते.१९८० नन्तर मात्र मुलुंडचा छान कायापालट झाला. गव्हाणपाडा रस्त्यावर असलेल्या बैठ्या चाळी तोडून इमारती झाल्या. अनेक बँका व बासुरी हॉल सुरू झाला. मुलुंड मध्येच नाही तर अखख्या मुंबईत एक नंबर होईल असे छान देशमुख उद्यान तयार झाले. अशी अनेक उद्याने मुलुंडमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आली आहेत.
.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी! पण मुलुंड ही मुंबईची राजधानी वाटावी अशा सुधारणा झाल्या. बऱ्याच मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. पूर्वेला केळकर महाविद्यालयाबरोबरच पश्चिमेला मुलुंड कॉलेज हे वाणिज्य शाखेचे महाविद्यालय सुरू झाले. त्यामुळें मुलांच्या शिक्षणाची उत्तम सोय झाली. पूर्व-पश्चिमेला अनेक सुसज्ज रुग्णालये सुरू झाली. पाश्चिमेला आपना बाजार व भरपूर मॉल सुरू झाले. चित्रपटगृहे सुरू झाली. आणि त्याचबरोबर अत्यन्त प्रशस्त आणि सुसज्ज असे कालिदास नाट्यगृह सुद्धा सुरू झाले. बाजूलाच लहानथोरांसाठी तरण तलाव आहे.पूर्वेला गणपती विसर्जनासाठी छानसा तलाव आहे. रस्त्यांचे रुंदीकरण होऊन मुलुंडवरून मुंबईच्या कानाकोपऱ्यात बस सेवा सुरू झाली.त्यामुळे मुलुंडवरून मुंबईच्या कुठल्याही कोपऱ्यात अगदी सहजपणे प्रवास करता येऊ लागला. .
कित्येक विवाहमंडळे सुरू झाली आणि विवाहासाठी सुसज्ज असे हॉल ही सुरू झाले. मुलुंड पूर्वेचा मराठा मंडळ हा वातानुकूलित भव्य हॉल तर मुलुंडचे भूषण म्हणावे असाच आहे! या हॉल मध्ये विवाहसमारंभाबरोबरच इतरही अनेक उपक्रम होऊन मराठा बंधू-भगिनींच्या कलेला वाव दिला जातो. इतरही अनेक महिला मंडळे मुलुंडमध्ये आहेत. ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र तसेच गणपती, हनुमान, गावदेवी, कलावती आई, साईबाबा आणि स्वामी समर्थ यांची मंदीरेही खूप आहेत. काश्मीरला भारताचे नंदनवन म्हणतात, मी तर मुलुंडला मुंबई चे नंदनवन असेच म्हणेन!!