सौ. ऐश्वर्या ब्रीद
.
आनंद म्हणजे नेमकं काय हो? प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगवेगळी असणार. खरं तर आनंद ही एक मनाची सकारात्मक अवस्था आहे. मनाचे समाधान म्हणजे आनंद!
.
प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या गोष्टीत असू शकतो. अजिबात घाई न होता मस्तपैकी पकडलेली लोकल किंवा मिळालेली सीट, लोकलमधील आपला टपरी घोळका, चांगल्या हुद्द्याची नोकरी, भरमसाट पगार, स्वतःचे घर, अडीअडचणी पार करत वाढवलेला बीझनेस, एका आईसाठी तिची आपल्या आयुष्यात खूप मोठी आणि सुखी झालेली तिची लेकरे. तर कोणासाठी संगीत,वाद्य. लहान मूलांसाठी त्यांचं आवडतं चॉकलेट- आईसक्रीम आनंद देऊन जातं. एखाद्या कलाकाराची ब्रह्मानंदी टाळी लागते तर एखादा विठ्ठलाच्या चरणी लिन होण्यात धन्य होतो. आपल्याला कशात आनंद गवसतो हे एकदा कळले ना की दुःखाला वाव राहत नाही.
.
पण हा आनंद मृगजळासारखा आभासी असतो. त्याच्यामागे जेवढे पळू तेवढा तो आपल्यापासून लांब पळतो. हा आनंद काही क्षणांपुरता टिकतो. खरंतर दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणे यात परम आनंदाचे मुळ असले पाहिजे. आणि याची सुरुवात स्वतःच्या घरातून केली पाहिजे. आपण स्वतः आनंदी असलो की आपल्या कुटुंबातील सदस्य आनंदी राहतील. एकमेकांमधील संबंध घट्ट राहतील. कुटुंब सुखी असले की वास्तू शांत राहते आणि सभोवतालचे वातावरण आल्हाददायक राहते. पण हे एवढे सोप्पे नाही नं!! पैसा-संपत्ती वाद निर्माण करतात. हव्यास आपल्याला दुःखाच्या महासागरात लोटून देतो. दुरावा निर्माण होतो. क्लेश वाढतात. काही अपवादात्मक विभक्त कुटुंबात सर्व सदस्य घरात एकमेकांना कमी भेटतात. मुले पाळणाघरात वाढतात. मुलांना स्वतःच्या हातांनी वाढवण्यात मिळणारे परमोच्च सुख हे पालक गमावतात. संवाद खुंटतो. कधी अशा घरातील मुलं व्यसनाधीनतेकडे वळतात. पतिपत्नी विभक्त राहतात. कुटुंबाची परवड होते. इथे आनंदाला थाराच नसतो. पैशाच्या मागे धावतांना आयुष्याचे भान न राहिल्याने आनंद गमावला जातो.*
.
जगा आणि जगू द्या…! जन्म एकदाच मिळतो तोही आपण मनसोक्त जगतो कां? दुःखीकष्टी मानसिकतेने आपण आपल्या जन्माची वाट लावतो. भल्या भल्यांनी आनंद शोधण्यात जीवाचे रान केले पण आनंद काही मिळाला नाही. आलेल्या परिस्थितीवर मात करून आनंदाचे क्षण वेचणे अवघड नक्कीच नाही! त्यासाठी आयुष्याचे मूल्यमापन करता आले पाहिजे. स्वतःला ओळखता आले पाहिजे.*
.
“तुझे आहे तुजपाशी, परी जागा चुकलासी…!” आनंद, सुख आपल्या आतच आहे, आपण उगाच तो शोधण्यात वेळ,पैसे वाया घालवत असतो. “आपला आनंद आपणच शोधणे-निर्माण करणे …” मला वाटतं हीच आनंदाची गुरुकिल्ली आहे म्हणजेच स्वतःचे परीक्षण… स्वतःचे योग्य मूल्यमापन!! ते कसे करायचे? तर स्वतःला काही प्रश्न विचारायचे.
.
१. माझ्यामध्ये कोणते गुण- दोष आहेत?
२. मी अहंकारी आहे का? (अहंकार हा आनंदामधील मुख्य अडसर).
३. इतरांवर माझे विचार मी लादत आहे का?
४. प्रत्येकाची मते,विचार माझ्या विचारांपेक्षा वेगळे असू शकतात याची मला जाणीव आहे का? ५. कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी मी सज्ज आहे का? माझा स्वतःवर विश्वास आहे का?
६. माझ्या वागण्याने इतरांना मी वेठीस धरत असतो का?
७. न पेलणाऱ्या कामांचं आणि जबाबदऱ्यांचं ओझं मी माझ्यावर लादून घेतोय का?
८. माझा राग अयोग्य प्रकारे व्यक्त करून इतरांसाठी मी त्रासदायक ठरतोय का?
९. आता आलेली वाईट परिस्थिती पुढे कधीतरी बदलणार आहे यावर माझा विश्वास आहे का?
१०. कोणत्याही समस्येवर पर्याय आहे यावर माझा विश्वास आहे का?
११. माझे दुःख मी सतत कुरवाळत राहून स्वतःला व जवळच्यांनाही मी दुःखी, कष्टी ठेवत आहे का?
.
स्वतःचे असे परीक्षण करून सकारात्मक उत्तरे शोधून आनंद वेचणे अवघड असले तरी अशक्य मुळीच नाही. नेहमीच्या कामातून वेळ काढून इतर आवडत्या गोष्टींत मन रमवणे. नाटक,सिनेमा, संगीत,खेळ यांचा आस्वाद घेणे. उत्सव-समारंभ यांतून मित्रमंडळी-नातेवाईक यांसोबत संबंध दृढ करणे. सहल-पर्यटन यातून मनाला उभारी आणणे. जवळच्या व्यक्तींना वेळ देणे. मनातील चांगल्या-वाईट विचारांची इतरांसोबत देवाणघेवाण करणे. सर्वांचा आदर करणे. स्वतःला निंदा-नालस्ती व मोह-मायेपासून दूर ठेवणे. विविध स्पर्धांमधून भाग घेणे. एखादी आवड-कला जपणे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करणे, वेळेचे उत्तम नियोजन करणे… यांतून आपले जीवन प्रफुल्लित, उल्हासित करून आपण सदा टवटवीत राहू शकतो आणि वयालाही हरवू शकतो.*
.
कविवर्य मंगेश पाडगांवकर म्हणतात…
.
पेला अर्धा भरलेला आहे
असेही म्हणू शकतो
पेला अर्धा सरलेला आहे
असेही म्हणू शकतो
भरलेला आहे म्हणा
सरलेला आहे म्हणा
तुम्हीच ठरवा!
कसं जगायचं?
कण्हत कण्हत की….
गाणं म्हणत?
तुम्हीच ठरवा!!
.
खरंच आपला आनंद आपणच शोधुया. भूतकाळात रमून… भविष्याची काळजी करत, वर्तमान बिघडू न देता आजचे क्षण आनंदाने अनुभवूया! आनंदाचे झाड आपल्या अंगणात लावूया. आपल्याच हातातील या आनंदाच्या वेगवेगळ्या किल्ल्या एकाच जुडग्यात बांधून,सांभाळून त्या-त्या कुलूपाला उघडूया! आनंदाने नाचूया! बागडुया मग बघा काय घडेल….
आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोहीकडे…!!