नमस्कार!
सभासद बंधू-भगिनींनो, गेल्या २७ ऑगस्ट २०२३ रोजी मंडळाच्या निवडणूकीद्वारे विद्यमान कार्यकारी मंडळ निवडून आले, तेव्हांपासून आजवर सुमारे वर्षभराच्या कालावधीत नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने मंडळाच्या सर्वांगीण विकासासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याने व शुभाशिर्वादाने उत्तम प्रकारे कामकाज चालविले आहे. एखादी संस्था किंवा संघटना मोठी झाली, नावारुपास आली की तेथे वैचारिक वैचारिक अभिसरण सुरु होते.. कांही वेळा विचार व आचार भिन्नता जाणवू लागते. हा खरे तर काळाचा महिमाच म्हणावा लागेल. आपल्या मंडळाने आता ४४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या चौवेचाळीस वर्षांच्या सलग वाटचालीचा, आपणा सर्वांच्या विश्वासाचा मी एक साक्षीदार आहे. मंडळाची स्थापना ज्यांच्या संकल्पनेतून झाली ते आदरणीय कृ. बा. शिर्के हे आजही आम्हां सर्वांना शुभाशिर्वाद व सामाजिक ऊर्जा देण्यासाठी आपल्या मंडळाकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेऊन आहेत. मंडळाचे पहिले अध्यक्ष ऋषीतुल्य कै. वसंतराव सकपाळ यांच्या बरोबरच कै. धनाजीराव कदम, कै. चंद्रकांत देसाई, कै. गोपाळराव भोसले, कै. भाई सावंत, कै. राजाराम महाडिक, कै. जयरामराव भोसले, कै. सुधाकर महाडिक व कै. आत्माराम शिर्के अशा सर्व दिवंगत बुजूर्ग समाज धुरिणांचा वैचारिक वारसा मला लाभला हे मी माझे परम भाग्य समजतो. या सर्वांच्याच निःस्वार्थी व बहुमोल विचार धारेवर अनेक कार्यकर्त्यांचा पिंड पोसला गेला आहे. आणि म्हणूनच आज सुमारे चौवेचाळीस वर्षात मंडळामध्ये समर्पणाच्या भावनेने सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी तयार झाली आहे. मंडळाच्या या खडतर वाटचालीत अनेक अडचणी, समस्या व प्रसंगी वादळे सुध्दा निर्माण झाली. परंतु ती एका जाज्वल्य निष्ठेने व अभेद्य एकजुटीने शमविण्यात यश आले.
गेल्या चौवेचाळीस वर्षांच्या इतिहासाकडे मागे वळून पहाताना एखाद्या वारुळामधून बाहेर पडणाऱ्या मुंग्याप्रमाणे असंख्य आठवणी व प्रसंग डोळ्यासमोर उभे रहातात. महाराष्ट्र शासनाने मंडळाला दिलेल्या भूखंडाचा ताबा तत्कालीन अध्यक्ष कै. गोपाळराव भोसले व सरचिटणीस म्हणून मी अशा दोघांनी माहे डिसेंबर १९८९ मध्ये घेतला व तेव्हांपासून मंडळाच्या सांस्कृतिक केंद्र इमारतीच्या कामाचा शुभारंभ झाला. अनेक अडथळ्यांची ही शर्यत आपणा सर्वांच्या सहकार्याने, परिश्रमाने व शुभाशिर्वादाने आपण पूर्ण केली. गेल्या १०/११ वर्षांपासून आपल्या सांस्कृतिक केंद्र इमारतीमध्ये सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक अनेक दर्जेदार कार्यक्रम सादर केले जातात, त्यांना मंडळाच्या सभासदांचा व रसिकांचा उत्तम प्रतिसाद असतो. याच काळात मंडळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा, संगणकीकरणाचा वेध घेऊन नव्या विचाराने प्रेरित झालेला तरुण कार्यकर्ता वर्ग मोठ्या आत्मियतेने व निष्ठेने सहभागी होत आहे. समाजातील मुला-मुलींसाठी, महिलांसाठी मंडळाने खास व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. मंडळाचे सर्व अंगीकृत उपक्रम नव्या-जुन्या कार्यकर्त्यांच्या, आदरणीय सल्लागारांच्या परस्पर समन्वयाने उत्तम प्रकारे चालले आहेत. या अहवाल पुस्तिकेच्या निमित्ताने आपणा सर्वांशी संवाद साधणारे माझे हे मनोगत येथेच पूर्ण करतो.

श्री. रमेश र. शिर्के
(अध्यक्ष – मराठा मंडळ मुलुंड, मुंबई)