कवितेचे नाव आहे.... आमचे हे.

कवितेचे नाव आहे....       आमचे हे.  

काय सांगू मैत्रीणींनो
आमच्या यांची कथा
म्हणू नका साऱ्याजणी
आमची पण तीच व्यथा

आमचे हे दिसतात बाई
फार साधे भोळे
लक्ष नसतं कुणाचं की
वटारून बघतात डोळे

साऱ्यांसाठी आमचे हे
जणू गरीब गाय
माझ्यात मात्र खलनायिका
दिसते ठाय ठाय

सगळ्यांसमोर करतात
माझ्या हो ला हो
एकटी तावडीत सापडताच
सुरू ठो ठो

सारं खरं असलं तरी उपाय 
नाही दुसरा
त्यांच्या शिवाय कोण देईल
काहो आसरा

त्यांना सुद्धा माहित असत
हीच्या शिवाय पर्याय नाही 
गुपचूप बसतात कधी कधी
जणू काहीच समजत नाही

कितीही काही झालं तरी सावरून घ्यायचं
गुपित तक्रारी रडगाणी
कोणाला बरं सांगायचं

साऱ्या जगी मिळतो
त्यांच्या नावानेच मान
सगळं नका सांगू थोड
झाकून ठेवा छान

खरं सांगते मैत्रीणीनो
हक्काचा तो बरा
बायकोला सहन करतो
तोच एकटा बिचारा.

कवयित्री : सौ. मीनल सावंत


";