राणीची बाग जिजामाता उदयान

मराठा मंडळाच्या वेबसाइटवर माझा कट्टा सुरु झाल्यापासून मला सुद्धा काही लिहायला हवे. असे एक सारखे मनात येत होते. पण कोणत्या विषयावर लिहावे हे काही सुचत नव्हते.

ब-याच दिवसांनी मग माझ्या लक्षात आले की मी माझ्या स्वतःच्याच बालपणातील रोचक घडलेल्या प्रसंगाबद्दल का बरं लिहू नये. जेणेकरुन वाचकांना वाचताना आपल्या स्वतःच्या बालपणातील किस्से आठवतील आणि त्यांच्याही आठवणींना उजाळा मिळेल. तसे म्हटले तर बालपण प्रत्येकाला हवेहवेसेच वाटत असते. असे हे निरागस, सुंदर बालपण मनुष्य आपल्या जीवनात एकदाच तर अनुभवतो. आतापर्यंत माझ्या बालपणातील लोटलेला काळ तसा मला जगावेगळाच वाटत आलेला आहे. तो काळ माझ्या करता अविस्मरणीय यासाठी वाटत रहातो. कारण माझ्याकडुन  ब-याच गोष्टी आठवणीत राहतील अशा कळत नकळत घडत गेलेल्या होत्या.



 *राणीची बाग..* -  वीरमाता जिजाबाई भोसले उदयान व प्राणिसंग्रहालय 
       
माझा जन्म भायखळा येथील सुर्यवंशी भुवन येथे झाला. शेजारीच राणीबाग म्हणजे वीरमाता जिजामाता भोसले उद्यान त्यापुर्वी उद्यानाला व्हिक्टोरिया गार्डन असे संबोधले जायचे.
राणीबागेत वेगवेगळ्या प्राणी-पक्ष्यां व्यतिरिक्त भरभरुन फळाफुलांची झाडं होती. त्यावेळेस कधी तिकीट काढून राणीबागेत प्रवेश केला असे कधी झाले नाही. जणूकाही राणीबाग आपल्याच हक्काची, मालकीची या अविर्भावात मी आणि माझा मित्र परीवार त्यावेळी वावरत असायचा.

कैरी, चिंच, टेंबुर्णी (एक कडक आवरण असलेले फळ), रामफळ, सीताफळ, चिक्कू, ताडगोळे अशी अगणित फळझाडे एकत्रितपणे मी कुठे पाहीली नाही. अवाढव्य विस्तीर्ण पसरलेल्या राणीबागेच्या उद्यानाचा कोपरा न् कोपरा मला माहित होता. इतकी राणीबागेत मी भटकंती केली. भरगच्च झाडीझुडपे, पशुपक्षांचे वेगवेगळे आवाज खुपच सुंदर नैसर्गिक अशा वातावरणात छान फिरावेसे वाटायचे. जसजसा मी मोठा होत होतो तसतसे राणीबागेचे आकर्षण वाढत होते. राणीबागेला लागुन खेळाचे मैदान होते. शाळा सुटली की दप्तर घरी टाकायचे आणि मग तडक मैदानावर जायचे. हा नेहमीचा नित्यक्रम ठरलेला होता.
       
मैदानाच्या शेजारीच डुकराचा पिंजरा होता. साधारण आठ दहा डुक्कर त्यात असायचे. क्रिकेट खेळत असताना बॉल ब-याचदा त्या पिंज-यात जायचा. तो आणायला माझ्यासारखी धाडसी मुलं धडाधड हातात दगड घेऊन उंच शिगांवरुन  उड्या मारुन बॉल घेऊन येत असत. हातात दगड एवढ्या करता असायचा की दहशतीने डुक्कर जवळपास भटकु नये. अर्थात हे माझे कृत्य तसेच अनेक इतर साहसी गोष्टी सर्व घरातल्यांच्या अपरोक्ष असायच्या. एप्रिल महिना होता. आंब्याच्या झाडांना चांगलाच मोहर लागुन गेलेला होता. असंख्य कै-या झाडांवर दिसायला लागल्या होत्या. मैदानाच्या कोप-यावर डुक्कर आराम करतात तो बंदिस्त असा पिंजरा होता. त्यावर लोखंडी पत्रा असलेले छप्पर होते. त्या पिंज-या शेजारी एक दोन आंब्याची झाडं होती. पिंज-यावर चढले की सहज कै-या हाताला लागायच्या. पण शक्यतो कोणीही धाडस करीत नसायचे. कारण डुकराच्या पिंज-यावरील पत्रा गंजलेल्या अवस्थेत होता.
       
एके दिवशी मी नित्यनेमाने मैदानात गेलो. दुपारची वेळ होती आणि कै-या काढण्याकरता पिंज-यावर चढलो. माझ्या सोबत माझी लहान बहिण बरोबर होती. मी तिच्याकडे काढलेल्या एक एक कै-या टाकत होतो. तशी ती जमा करुन पिशवीत भरत होती. अचानक कै-यांचा गच्च भरलेला घड नजरेस भरला. पण तो प्रयत्न  करुन टाचा उंचावुन उंच उडी मारुन पकडण्यात यश मिळत नव्हते. आतापर्यंत बहिणही निराशेने कंटाळलेल्या अवस्थेत माझ्याकडे बघत राहिली होती. मग मनाचा पक्का निश्चय करुन घड पकडण्याकरता एक उंच अशी यशस्वी झेप घेतली. चार पाच कै-यांचा घड माझ्या घट्ट मुठीत आता सामावला होता. परंतु दुसर्‍याच क्षणी गंजलेला पत्रा तुटुन, मी झोपलेल्या डुकरांच्या पुढ्यात वरुन येऊन पडलेलो होतो.

पिंज-यावरील मोकळे वातावरण आणि पिंज-याच्या आतील भितीदायक वातावरण समजायला मला क्षणभरही वेळ लागला नव्हता. तसे आराम करण्याच्या अवस्थेतील सर्व डुक्कर हा कोणता बरं प्राणी अचानक धाडकन पुढ्यात येऊन पडला,अशा या भीतीने दचकून सर्वच्या सर्व मागच्या मागे पाठी सरकले. बाहेरुन माझ्या कानावर सारखी बहिणीची 'हेमंत हेमंत' अशी आर्त हाक ऐकू येत होती. पडलेल्या अवस्थेत थोडे सावरल्यावर बाहेर पडण्यासाठी इकडे तिकडे लक्ष दिले. माझ्याच पाठीमागे एक छोटासा दरवाजा दिसला. इतके सगळे होऊनही कै-यांचा घड तसाच घट्ट माझ्या मुठीत होता. कसे तरी करुन उठलो. भरपुर माती असल्याने आठ फुटाच्या उंचीवरुन पडूनही काही लागले नव्हते. आठनऊ वर्षांचा मी तसा हलकाच होतो. पण गंजलेला पत्रा असल्याने हातापायांना खरचटलेले मात्र होते.
       
अंग खुपच जड झाले होते. झटकन बाहेर पडणे शक्य होत नव्हते. तसे अंग जड नसते तरी बाहेर शिताफीने पळणे डुकरांसाठी आव्हानात्मक ठरले असते. हळुहळु अंदाज घेत बाहेर पडलो. एकही डुक्कर जागचा हल्ला नाही. अगदी शांत समंजसपणे ते सर्व निरिक्षण करीत राहीले. कदाचित त्यांच्या मनात विचार आला असेल. याला जाऊ द्या एकदाचे नाहीतरी आमच्या झोपेचे खोबरे याने करुन टाकलेलेच आहे. छोट्या पिंज-यातुन बाहेरच्या दुसऱ्या मोठ्या पिंज-यातील शिगांवरुन चढून कसाबसा बाहेर पडल्यानंतर हुश्श करुन सुखरुपतेचा श्वास सोडला. व्याकुळतेने बाहेर वाट पहात असलेल्या बहिणीने एव्हाना कानाला खडा लावलेलाच असणार याची कल्पना मला आली होती. पुन्हा यानंतर ती कधीही कुठेही माझ्या सोबत घरा बाहेर पडली नाही. असो.

आता हे लिहिताना रंजक वाटत असले तरी त्यावेळी दोन चार डुकरांनी जरी हल्ला केला असता तरी त्या लहान वयात मला जडच गेले असते. मग ही घडलेली घटना गोष्टीरुपात आता आपल्यापर्यंत पोहोचलीही नसती. तसे कदाचित त्या काळात मोबाईल असता तर कोण कशाला अशा या भानगडीत पडले असते. परंतु आयुष्यात लिहिलेल्या गोष्टी टाळता येत नाहीत. घडायच्या असतात त्या घडतातच. हे तितकेच खरे आहे असे मला वाटते. 

अशाच प्रकारचे बरेच प्रसंग, घटना माझ्या बालपणाच्या काळात घडल्या. त्यातील ही वरील घटना मनात घर करुन राहिली. हे मात्र खरे.
                               
धन्यवाद.....!

हेमंत भोगले.. ✍????