*श्री स्वामी समर्थ मठ,पळसदरी* *॥ एक अनुभूती II*

*श्री स्वामी समर्थ मठ,पळसदरी* *॥ एक अनुभूती II*

आज अचानक गणेश जयंतीच्या निमित्ताने पळसदरीच्या श्री स्वामी समर्थांच्या मठात जाण्याचा योग जुळून आला. गेल्या दोन दिवसांपासून माझ्या मनात मठाला भेट देण्याचे विचारचक्र सुरू होते. नामस्मरण करतानाही तोच विचार. मी इच्छा प्रकट केल्यावर यजमानही लगेच जाऊया म्हणाले. फक्त मला जमेल का, हे महत्त्वाचे! कारण माझी तब्बेत हल्ली थोडी बरी नसते. जमेल की नाही ही शंका कुठेतरी मनात यायची. पण काल रात्री स्वामीं समोर प्रार्थना करताना म्हटले, स्वामी तुमच्या दर्शनाला येण्याची मनापासून खूप इच्छा आहे. मला सुखरूप तिथे जाऊन, घरी सुखरूप परत आणण्याची तुमचीच जबाबदारी आहे. कारण तिकडचे काहीच माहित नव्हते. माझी मैत्रिण एकदा मला म्हणाली होती, खोपोली गाडीने पळसदरीला जायचे. तिथून रिक्षा असतात.

ळसदरीला जायला मुलुंडवरून सकाळी ८.०६ वा.च्या खोपोली लोकलने आम्ही उभयता निघालो. साधारण १० वाजता पळसदरी स्टेशनवर उतरलो. परंतु पुढे जायचे कसे काहीच कळत नव्हते. उतरलेले २-३ लोक पटापट प्लॅटफॉर्मवरून उड्या मारून निघून गेले. विचारायलाही कुणी दिसत नव्हते. प्लॅटफॉर्मच्या एका टोकाला गावातील ३-४ बायका बसल्या होत्या. त्यांना विचारले तर त्या म्हणाल्या, इथे रिक्षा वगैरे काही नाहीत ताई. तुम्हाला या पायवाटेनेच जावे लागेल. १५-२० मिनिटे लागतील. रस्ता तसा खडकाळ आणि अरुंदच होता. मला चालणे अवघडच होते. स्वामींचे नाव घेऊन सुरुवात केली तोच, तिथे बाईकवर बसलेला एक मुलगा दिसला. त्याला विनंती केली. बोलत असताना दुसरे एक गृहस्थ बाईक वरून तिथे आले. कुठे जायचेय, त्यांनी विचारले. परिस्थिती कळल्यावर ते ही तयार झाले. त्या दोघांनी आम्हाला बाईक वरुन व्यवस्थित मठा पर्यंत सोडले. तिथून पुढे जाऊन लगेच मठ आहे. हातपाय धुऊन मठात प्रवेश केला. हा मठ श्री. दरेकर यांनी बांधलेला आहे. "श्री स्वामी समर्थांनी २२ दिवस येथे वास्तव्य केले होते. तिथेच २२ दिवसात हा मठ बांधून पूर्ण केलाय."

मठात प्रवेश केल्यावर मठाचे प्रशस्त आवार डोळ्यांत भरते. समोरच स्टेजवर गणपतीची सुंदर मूर्ती आहे. मूर्तीवर नागाने छत्र धरले आहे. गाभाऱ्यात उजव्या बाजूला गणपतीची सुंदर मूर्ती असून डाव्या बाजूला  स्वामींची उभी मूर्ती आहे. आतमध्ये गाभाऱ्यात स्वामींचा फोटो, अन पायाशी स्वामींचा मुखवटा आहे.

मठाच्या खाली तळघर म्हणजे स्वामींचे 'ध्यान मंदिर' आहे. तेथे काळोख होता.  मूर्तीच्या आजूबाजूला जेवढा दिव्याचा प्रकाश होता तेवढाच! त्या प्रकाशात स्वामींचे कारुण्याने भरलेले डोळे मात्र आपल्यावर कृपेचा वर्षाव करत आहेत असे भासते. ध्यानमंदिरातून वर आल्यावर पुन्हा डोळे भरून स्वामींचे दर्शन घेतले. नामस्मरण केले. आता परत घरी जाण्याचा मार्ग धरायचा होता. तिथल्या सेवकांनाच जाण्यासाठी काय सोय आहे, हे विचारल्यावर त्यांनी सांगितले चालत चालत १० मिनिटांवर हायवे लागेल. तिथून टमटम किंवा रिक्षा मिळेल कर्जतला जाण्यासाठी. दुपारचे १२ वाजत आले होते. काय करावे या विचारात असतानाच, एका भक्ताने कुठे जायचे विचारले. तेही स्वामी दर्शनाला सहकुटुंब लोणावळ्याहून आले होते. वयस्करच होती मंडळी. सोबत त्यांचा मुलगाही होता. लगेच म्हणाला, मी तुम्हाला हायवे पर्यंत सोडतो. गाडीत बसा. आणि काय आश्चर्य !! त्यांनी आम्हाला सरळ कर्जत पर्यंत सोडले. त्यांचे खूप खूप आभार मानले. स्टेशनला आल्यावर लगेच लोकल लागली!

खरोखरच, स्वामींनीच आमचा हा प्रवास अतिशय सुसह्य करून दिला होता. स्वामींची लिला अगाध आहे याची प्रचिती पुन्हा आली. 

*"अशक्य ही शक्य करतील स्वामी !!"*

सौ. प्राची पालव.

मराठा मंडळ मुलुंड,मुंबई.