छंद म्हणजे स्वत:ची लय. छंद म्हणजे स्वत:चा शोध. छंद म्हणजे स्वत:चा आणि इतरांचाही आनंद. खरंच,आपल्या आवडीनिवडींना,आंतरिक ऊर्मीना आयुष्यात जागा द्यायलाच हवी. या तरुण वयात एक तरी छंद जोपासावा, कारण तीच आपली खरी ओळख असते. त्यातूनच आपल्याला खरंखुरं समाधान मिळत असतं.
आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात छंद आपल्याला आनंद मिळवून देतात. छंद असणं हे वेगळंच रसायन असतं. काहींना वेगवेगळे छंद असतात. एकच छंद जोपासणे ही एका अर्थाने अवघड कला असते. छंद म्हणजे काय, असं विचारलं तर लोक म्हणतात की ही फावल्या वेळी करायची गोष्ट, रिकाम्या वेळेचा विरंगुळा. मला मात्र हे पटत नाही. मला वाटतं, छंद हीच तर आयुष्यात करायची मुख्य गोष्ट आहे. पुढे मग पोट भरण्यासाठी नोकरी, शिक्षण वगरे वगरे करावं लागतंच. पण आपल्याला खरी ओळख मिळते, जगण्याचा अर्थ मिळतो आणि समाधानही मिळतं ते अशा छंदांमधून.
प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. कसलाच छंद नाही अशी व्यक्ती सापडणं विरळाच! कोणी टपाल तिकिटं जमवतं, कोणी जुन्या नाण्यांचा संग्रह करतं, कोणाला गाणी ऐकण्याचा छंद असतो तर एखादा शक्य तितके गड-किल्ले सर करतो. एकसमान छंद जोपासणारे अनेक जण एकत्र येऊन एखादा समूह स्थापन करतात आणि असे कित्येक गट मिळून आपला छंद जोपासताना दिसत आहेत.
रिकामा किंवा फुरसतीचा वेळ घालविण्यासाठी, मनोरंजनासाठी, त्याचप्रमाणे हौस किंवा विरंगुळा म्हणून माणूस जे जे काही करतो, ते सर्व छंदात मोडते. छंदांनी व्यक्तिमत्त्वाला नवनवीन पैलू व परिमाणे प्राप्त होतात. छंद माणसाला दु:ख विसरायला लावतातच; पण छंदामुळे स्वत:मधली क्रिएटिव्हिटीही वाढते, म्हणून देखील छंद जोपासण्याकडे हल्ली लोकांचा कल वाढलाय. छंद अनेक प्रकारचे असले तरी त्या प्रत्येकातून आनंद मात्र हमखास मिळतो.
अनेक विद्यार्थ्यांना छंद म्हणजे काय हे देखील कळत नाही. नवीन माहिती मिळवणे, धिंगाणा करणे, ओळखी करणे, हसवणे, सकाळी फिरायला जाणे असे छंद असल्याचे काही जण सांगतात. काही व्यक्ती कुठला छंद जोपासतात हे पाहणंही नवलाईचं आहे. नाणी जमवणे, पोस्टाची तिकिटे किंवा विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्यांचे हस्ताक्षर जमवण्याचा छंद.
त्याच त्याच क्षेत्रातल्या त्याच त्याच कामातला तोचतोचपणा आणि धावपळीच्या दिनचय्रेमुळे मनाला मळभ येतं. हे मळभ दूर करण्यासाठीच एक विरंगुळा म्हणून काहीसे छंद जोपासणं महत्त्वाचं आहे. ड्रॉईंग, ट्रेकिंग, पॅरासेलिंग, वॉटर राफ्टिंग, भटकंती, गायन आणि वाचन हे छंद जोपासण्यासाठी गांभीर्यानं लक्ष द्यावे लागते. हे छंद एक प्रकारचे पॅशन असते. विरंगुळ्यासाठी पुरेसा वेळ दिल्यानेच धावपळीच्या करिअरचा ताण भासत नाही.
रोजची धावपळ, कामाचा ताण, तिथली टेन्शन्स, जगण्यातले वादविवाद.. घडयाळाच्या काटयावर क्षण न् क्षण अवलंबून असणा-या आयुष्यात जोपासलेला छंद
औषधासारखं काम करतो. छंद जोपासणे हा मानवी गुण आहे. मात्र काही आगळावेगळा छंद जोपासल्यास जीवनात आनंद मिळू शकतो. जसा साप पकडणे हा सर्पमित्रांचा पिढीजात छंद आहे. छंद हे मानवी जीवनाचे अभिनव अंग आहे. प्रत्येकास काहीना काही आवड असते व त्याचे छंदात रूपांतर होते. छंदामुळे तुमच्या वेळेचा उत्तम वापर होतो.
छंदांनी माणसाला ओळख मिळते. माणसालाच छंद असतात. छंद माणूसपण टिकवतात. माणूसपण वाढवतात. माणसाला स्वत:ला शोधण्याची, स्वत:ला व्यक्त करण्याची संधी देतात. जगण्यावर प्रेम करायला शिकवतात. मन रमवतात.
जीवनाचा, निर्सगाचा, माणसाच्या मनाचा शोध घ्यायला शिकवतात. स्वत:चे छंद, समाजोपयोगी काम करणं यातून स्वत:ची ओळखही गवसते आणि जगण्याची नवी दृष्टीही लाभते. जीवनात स्वत:लाच आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार एकतरी छंद
जोपासलाच पाहिजे. तुम्हाला कोणत्याही कलेची खरी आवड असेल तर त्यासाठी वेळ आपोआप निघतो आणि नवनिर्मितीतून मिळणारा आनंदच तुमच्या छंदाला जागृत ठेवू शकतो. तेव्हा आपले जे काही छंद असतील त्यांना न्याय द्यायला आत्ताच सुरुवात करा. तहान-भूक हरवून छंद जोपासण्याची प्रवृत्ती कधी जिवाला पिसे लावून जाते हे कळत नाही.